मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक बोलतोय! सांगून तोतयागिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘मी मुख्यमंत्री यांचा स्वीय सहायक कानडे बोलत असून, एनडीसीसी बॅंकेचे सक्तीच्या रजेवर असलेले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांना कर्तव्यावर हजर करून घ्या’ असा फोन करून तोतयागिरी करणाऱ्या भामट्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एनडीसीसी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल क्रमांकधारकाविरोधात तोतयागिरी प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने २८ ते २९ नोव्हेंबरदरम्यान फोन केले होते. चव्हाण हे बँकेच्या गेस्ट हाउसमध्ये असताना त्यांना भामट्याने मोबाइल क्रमांकावरून फोन केला. फोनवरून बोलणारी व्यक्ती स्वत: लोकसेवक नसतानाही त्याने स्वत:ची ओळख मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याची करून दिली. मुख्यमंत्री साहेबांचा पीए कानडे बोलत असल्याचे सांगून सक्तीच्या रजेवर व चौकशी सुरू असलेले शैलेश पिंगळे यांना कामावर हजर करून घेण्यासंदर्भात संशयिताने चव्हाण यांना सूचना केली. त्यामुळे चव्हाण यांनी भद्रकाली पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली आहे. भद्रकाली पोलिस संबंधित मोबाइल क्रमांकावरून संशयिताचा माग काढत आहे.

जून २०२३ मध्ये गटसचिवांच्या बेकायदा निधी अपहार प्रकरणाची ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर ‘एनडीसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेंद्र पिंगळे आणि स्वीय सहायक योगेश पाटील यांना प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तेव्हापासून पिंगळे हे सक्तीच्या रजेवर आहेत. तसेच अज्ञात भामट्याने मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहायकाच्या नावे तोतयागिरी करून फोन केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा :

The post मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक बोलतोय! सांगून तोतयागिरी appeared first on पुढारी.