आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

Kolhapur

आसिफ सय्यद

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवा-सुविधांच्या मूल्यमापनाचा राज्यस्तरीय अहवाल जाहीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य-वैद्यकीय सेवा पुरविण्यात कोल्हापूरने पहिला क्रमांक पटकावला असून, नाशिक महापालिका राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव सर्वात शेवटी 27 व्या स्थानी आहे. बृहन्मुंबई, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव महापालिकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरजकुमार यांनी ताशेरे ओढले आहेत. (Kolhapur)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल आरोग्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांसह गरजूंना आरोग्य सेवा पुरविली जाते. यातील कोणत्या सेवा अधिकाधिक देण्यात आल्या, तसेच सुविधांचा रुग्णांना लाभ मिळाला का, याची राज्यस्तरावर दर महिन्यास तपासणी केली जाते. त्यात रुग्णालय, आरोग्यवर्धिनी, रुग्णकल्याण समितीच्या कार्याचेही मूल्यमापन करण्यात येते. राज्यस्तरावर दर महिन्यास मूल्यांकन करून रँकिंग दिली जाते. यात पहिल्या स्थानावर कोल्हापूर, दुसरे सांगली, तिसरे पुणे तर चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. (Kolhapur)

The post आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.