मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

विजय करंजकर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांची एेनवेळी उमेदवारी कापल्याने, ते सध्या नाराज आहेत. अशात ते बंड करतील, महायुतीच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत, शिंदे गटात ते लवकरच प्रवेश करतील अशा चर्चा सातत्याने पुढे येत आहेत. मात्र, या केवळ चर्चा असून, त्यात काहीही तथ्य नाही. तसेच उद्धव साहेबांनी बोलावल्यास, त्यांना नक्की भेटायला जाईल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया करंजकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे करंजकर यांना साहेबांचे आवतन आल्यास, त्यांचे बंड थंड होवू शकते?, अशी अपेक्षा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विजय करंजकर यांनाच मविआकडून उमेदवार दिली जाईल, असे बोलले जात असल्याने त्यांनी प्रचाराचा श्रीगणेश केला होता. मात्र, एेनवेळी त्यांचा पत्ता कट करीत, राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकल्याने, करंजकर दुखावले होते. त्यांनी ‘निवडणूक लढणार आणि पाडणार’ असे विधान करीत, बंडाचा पवित्रा घेतला होता. तत्पूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरच पुढील दीक्षा ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार करंजकर दोनदा उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र, भेट होऊ न शकल्याने, ते माघारी परतले. त्याचदरम्यान, ते महायुतीचे उमेदवार असतील अशा चर्चा रंगल्या. शिवाय ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही बोलले गेले. मात्र, या सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगत, करंजकर यांनी उद्धव ठाकरेंची भेटीची प्रतिक्षा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज जरी करंजकर बंडाच्या पवित्र्यात दिसत असले तरी, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांचे बंड थंड होईल, अशी अपेक्षा मविआच्या स्थानिक नेत्यांना आहे.

मी महायुतीचा उमेदवार असेल, मी शिंदे गटात जाईल या चर्चा मी माध्यमातूनच वाचतो, एेकतो आहे. ‘मी लढणार आणि पाडणार’ असे विधान केले होते. ते स्वाभाविक आहे. कारण जो व्यक्ती निवडणूकीची तयारी करतो, मात्र एेनवेळी त्याची उमेदवारी कापली जात असेल तर अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला निवडणूक लढविण्याची इच्छा असते, त्यामुळे असे विधान करण्यात गैर काय? उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास त्यांना नक्की भेटायला जाईल. – विजय करंजकर, नेते, शिवसेना ठाकरे गट

हेही वाचा –

The post मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर appeared first on पुढारी.