मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

पौषवारी यात्रोत्सव pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव तयारी आढावासंदर्भात रविवारी (दि. ४) मुंबई येथे वर्षा निवासस्थान येथे बैठक पार पडली. बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सुहास कांदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी येत असतात. संतपरंपरेतील विश्वगुरू अशी ओळख असणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराज यांचा पौषवारी सोहळा हा आषाढी आणि कार्तिकी वारी इतकाच भव्य स्वरूपात साजरा होतो. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच हा पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मंत्री भुसे आणि पारधे यांनी सोहळ्याच्या तयारीविषयी माहिती दिली.

वाहनांना टोलमाफी
पौषवारी यात्रोत्सव सोहळ्याचे नियोजन करताना प्रशासनाने त्याकडे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून पाहावे. यात्रोत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोलमाफी देण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला केल्या.

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा appeared first on पुढारी.