मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

मुख्यमंत्री pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सुरक्षित राज्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनांनी परिपूर्ण अशा ८३७ कोटी रुपयांचा सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाउड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटी रुपयांच्या सायबर सुरक्षा प्रकल्पाचे नियोजन केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व सायबर पोलिस ठाणे जोडण्यात येणार असून, २४ तास कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी, मोबाइल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार केल्यास या गुन्ह्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलिस शिपायांची सुमारे १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरू करण्यात येत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलिस अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते. राज्य पोलिस दलातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, १३ संघांचे संचलन केले होते.

क्रीडा संकुलांसाठी कोट्यवधींचा निधी
खेळातून उत्तम पोलिस मनुष्यबळ मिळत असल्याने क्रीडा सुविधांवरही भर देण्यात येत आहे. त्यानुसार बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस् सायन्स सेंटर उभारण्याचे नियोजन असून, छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास ५० कोटी रुपये व ४८ हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय ५० कोटी, जिल्ह्यासाठी २५ आणि तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डावपेच ओळखून खेळल्यास विजय निश्चित
राज्याच्या पोलिस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शारीरिक तंदुरुस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता, ताकद अंगी येते. खेळाडूना या पोलिस क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चांगले मैदान मिळत असून, हे मैदान जितके गाजवाल, तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होते. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे डावपेच ओळखून आपण आपला खेळ खेळल्यास विजय निश्चित असतो, असे मार्गदर्शनही शिंदे यांनी यावेळी केले.

The post मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन appeared first on पुढारी.