पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन

काळाराम मंदिरात भजन पूजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रामकुंड येथे गोदावरीची महापूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्तांनी मंत्रपठण केले. पंतप्रधानांनी काळारामाची आरती करतानाच भजन केले. यावेळी उपस्थित नाशिककरांनी दिलेल्या ‘सीयावर रामचंद्र की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

श्री काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य दरवाजाने प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांचे येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी हनुमानाचे दर्शन घेतले. हे दर्शन घेऊन पंतप्रधान मोदी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात दाखल झाले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी संकल्प केला. तसेच, श्री काळाराम मंदिरात रामरक्षा पठणदेखील केले. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधानांकडून विधिवत पूजा करवून घेतली. ही पूजा पार पडल्यानंतर मोदींनी श्री काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्वस्तांनी मोदी यांना भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. श्री काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामायणातील आठव्या अध्यायाचे वाचन

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील आठव्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

विवेकानंदांच्या पुतळ्यास अभिवादन

मंदिर परिसरातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी घोषणा दिल्या.

——-०——–

The post पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन appeared first on पुढारी.