सिन्नर पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी आज (दि. 27) जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले आहे.
राजाभाऊ वाजे यांचे आजोबा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे हे सिन्नरचे आमदार होऊन गेले. त्यांच्या आजी मथुराबाई वाजे या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या होत्या. राजाभाऊ वाजे यांचे चुलत आजोबा विठ्ठल बाळाजी वाजे हे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष होते. चुलत आजी रुक्मिणी बाई वाजे यादेखील माजी आमदार राहिल्या आहेत. 2014 पर्यंत राजाभाऊ वाजे हे केवळ सिन्नर तालुका जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यापुढे आव्हान उभे केले होते मात्र त्यांचा अवघ्या 2700 मतांनी पराभव झाला होता.
त्यानंतर 2014 साली त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आमदार माणिकराव कोकाटे यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. म्हणजेच 2014 पासून राजाभाऊ वाजे राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय राहिले आहेत.
रुक्मिणी बाई वाजे ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आमदार व मथुराबाई वाजे यादेखील महाराष्ट्रातील पहिल्या महिला नगराध्यक्ष होऊन गेल्या. मोठा राजकीय वारसा असूनही अनेक वर्ष राजाभाऊ वाजे हे राजकारणापासून दूरच होते.
The post मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर appeared first on पुढारी.