मोदींची प्रकृती बरी नाही, पराभव दिसत असल्यानेच ऑफरची भाषा

संजय राऊत , नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शारिरीक आणि मानसिक प्रकृती बरी नसावी. त्यामुळेच शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना ते एनडीएत येण्याची आॉफर देत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळेच ते आता आॉफरची भाषा करू लागले असून, चार जून नंतर ते माजी पंतप्रधान होतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

नंदूरबारमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार तसाच उध्दव ठाकरे यांना थेट एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या या प्रस्तावानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनीही यावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी हे भानावर नाहीत, त्यामुळेच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत, असे ते म्हणाले. या आॉफरमधून मोदींची पराभवाची भीती व्यक्त होत आहे. ‘अब की बार ४०० पार’ असा नारा मोदींनी दिला असला तरी ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोनशे जागांचा आकडा देखील पार करू शकणार नाहीत. भाजपचा खेळ १७५ ते १८०मध्येच संपले. मोदी हे चार जून नंतर पंतप्रधान राहणार नाहीत. ते माजी पंतप्रधान होतील, असा दावाही राऊत यांनी केला.

सुरूवातीला गुजरातेतील पांढरा कांदा निर्यातीला केंद्राने दिलेली परवानगी आणि त्यानंतर कांदा निर्यात बंदीचे जुनेच आदेश नव्याने दाखवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची केली जाणारी फसवणूक यावरही राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केली. केंद्रातील मोदी सरकार हे फसवणूक करणारे सरकार आहे. गुजरातमध्ये निवडणूक जिंकता यावी, यासाठी हा सारा उद्योग केला. फक्त गुजरातमधील व्यापारी आणि शेतकरी जगावा यासाठी हा सारा अट्टहास सुरू आहे. मोदी हे देशाचे नव्हे तर केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत, असा पुनरूच्चार करत मोदी पाकीस्तानचे एजंट असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा