मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार 

शांतिगिरी महाराज , नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करणारे शांतिगिरी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वारासणीला जाणार आहेत. खुद्द शांतिगिरी महाराज यांनीहीच ही माहिती माध्यमांना दिली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे गोडसे व महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे वाजे निवडणूक रिंगणात होते. महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी शांतिगिरी महाराज यांनी अनेक प्रयत्न केले. शिवसेना शिंदे गटाच्या नावाने त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. परंतु महायुतीची उमेदवारी गोडसे यांना मिळाल्याने शांतिगिरी महाराज यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार रॅलीदरम्यान शांतिगिरी महाराज यांनी गोडसेंच्या प्रचाररथावरील मोदींच्या कटआउटला पुष्पहार घालत केलेला पुष्पवर्षाव तसेच भाजपसह हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांनी आपल्यालाच पाठिंबा जाहीर केल्याचा केलेला दावा वादाचा विषय ठरला होता. या निवडणुकीत विजय कोणाचा होणार हे येत्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीतून समोर येणार आहे. मात्र, शांतिगिरी महाराज आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. मोदी हे माझे राजकारणातील आदर्श असल्याचे सांगत आपण त्यांच्या प्रचारासाठी वाराणसीला जाणार असल्याचे सांगत शांतिगिरी महाराज यांनी खळबळ उडवून दिली आहे. वाराणसीत आमचा भक्त परिवार आहे, असा दावा करत वाराणसीत आपण साधू-महंतांची भेट घेणार आहोत. मोदींचा प्रचार करणार आहोत, असे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उत्तर देताना भाजपमध्ये जायचे की नाही, हे आम्ही निवडणूक निकालानंतर ठरवू, असे त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांची भेट घेणार

राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढविल्याचा शांतिगिरी महाराजांनी नारा दिला होता. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी नाशिकच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. पुण्यातील अपघात घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराज हे नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेणार आहेत. नाशिक शहरातील अवैध धंदे बंद करावे. नाशिक हे धार्मिक शहर असल्याने त्याचे पावित्र्य राखावे, याबाबतचे निवेदन शांतिगिरी महाराज नाशिक पोलिस आयुक्तांना देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे राजकारणातील आदर्श आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मी वाराणसीला जाणार आहे. वाराणसीत आमचा भक्तपरिवार आहे. तेथील साधू-महंतांची आम्ही भेट घेऊन मोदींचा प्रचार करणार आहोत.

– शांतिगिरी महाराज, उमेदवार, अपक्ष

 

हेही वाचा –