नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील महायुतीच्या सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपच्या मांडीला मांडी लावून सहभागी झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार अजित पवार गटाच्या नेत्यांकडून व्यक्त होत असताना मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पाहणी दौरे, बैठकांकडे अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी वा नेता न फिरकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या तयारीत अजित पवार गटाच्या नेते-पदाधिकाऱ्यांची अलिप्तता चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटापाठोपाठ अजित पवार गटानेही भाजपची साथ करत राज्याच्या सत्तेत सहभाग घेतला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा मार्ग निवडला. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार भाजपसह शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चाही सुरू आहे. नाशिकसह अन्य काही जागांवर तिघा पक्षांनी दावा केला असला तरी वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून मार्ग काढण्याचा आणि महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल, या उमेदवाराला महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी पाठिंबा देण्याच्या आणाभाकाही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतल्या आहेत.
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त मोदी हे आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच महायुतीचा घटक पक्ष या नात्याने शिवसेनेचा शिंदे गटही मोदींच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा नाशिक दौरा करत मोदींच्या स्वागताची तयारी केली आहे. पालकमंत्री दादा भुसे हेही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून दौऱ्याच्या तयारीसाठी उभे आहेत. मोदी दौऱ्याच्या तयारीसाठी शासकीय बैठकांचा धडाकाच लावला आहे. भुसे हे सातत्याने दौऱ्याच्या तयारीच्या कामांचा पाहणी दौरा करीत आहेत.
शिंदे गटाच्या कार्यालयातही या दौऱ्याच्या तयारीसाठी बैठका झडत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही नेता वा पदाधिकारी मोदी दौऱ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या बैठका वा पाहणी दौऱ्यात गेल्या तीन-चार दिवसांत दिसून आला नाही. अजित पवार गटाचे प्रमुख नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये असूनही गुरुवारी (दि.११) मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे अजित पवार गट मोदींच्या दौऱ्यापासून अलिप्त का, असा सवाल नाशिककरांकडून केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी होणाऱ्या बैठकांबाबत अजित पवार गटाला कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. शुक्रवारी होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भुजबळ यांनी राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. – अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, अजित पवार गट
हेही वाचा :
- PM Modi Nashik : पंतप्रधान मोदींचा दोन किलोमीटरचा ‘रोड शो’, कोणत्या वाहनात?
- National Youth Festival : कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
The post मोदी दौरा तयारीपासून अजित पवार गट अलिप्त? appeared first on पुढारी.