नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरात ठराविक वेळेत जबरीचाेरी, घरफोडी सारखे प्रकार घडत आहेत. नाकाबंदी करूनही संशयित चेारटे पसार होत असल्याने पोलिसांनी सायंकाळच्या पायी गस्तीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे संशयित वाहनचालकाची चौकशी, त्याच्याकडील वाहनाची तपासणी केली जात आहे. त्यामुळे शहराच्या महत्वाच्या रस्त्यांसह कॉलनी परिसरातही पोलिसांचा वावर दिसत असून पोलिस अचानक तपासणी करत असल्याने गुन्हेगारांसह टवाळखोरांवर जरब बसत असल्याचा दावा केला जात आहे.
शहरातील वाढत्या जबरी चोऱ्या, घरफोडी नियंत्रणात आणण्यासह लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सायंकाळी पुन्हा पायी गस्त सुरू केली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. शहरात सोनसाखळी ओरबाडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच घरफोड्यांतही वाढ झाल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांना सक्रीय करत पोलिसांचा वावर जास्तीत जास्त दिसण्यासाठी गस्त वाढवण्याच्याही सुचना दिल्या आहेत. गुन्ह्यांची उकल किती झाली यासंदर्भात आढावा घेतला जात असल्याने पोलिसांवरही गुन्हेगारांची धरपकड करण्याचा अप्रत्यक्ष दबाव वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे न घडण्यासाठी वाहनांसह पायी गस्त वाढवली आहे. तसेच गस्तीदरम्यान, संशयास्पद वाहन किंवा वाहन चालक दिसल्यास त्याची चौकशी केली जात आहे. यात वाहनांची कागदपत्रे तपासणी, संबंधित परिसरात कोणत्या कामाने आले, परिसरातील ओळखीच्या व्यक्ती, संपर्क क्रमांक आदी प्रश्न विचारले जात आहे. निवडणुकीमुळे नाकाबंदी, तपासणी व कोम्बिंग ऑपरेशनच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. तरीदेखील सायंकाळी सहा ते आठ या वेळेत १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पायी गस्त सुरु आहे.
.. म्हणून गस्त
लोकसभा निवडणुकीमुळे शहरालगत १२ ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ तैनात आहेत. तसेच शहरांतर्गत गल्लीबोळांसह महत्वांच्या ठिकाणी पोलिसांचे पथके तपासणी, गस्त करीत आहेत. ठराविक ठिकाणी नाकाबंदी केल्यास संशयित त्यांचा मार्ग बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी पायी गस्तीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे नाकाबंदी व पायी गस्तीदरम्यान, संशयित वाहने थांबवून चालकांकडे कागदपत्रांची चौकशी सुरू आहे,
हेही वाचा –