यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी

महाराष्ट्रात 45 पक्षी प्रजातीवर टांगती तलवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडीच्या हंगामात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते. देश- विदेशातील पक्षी या ठिकाणी येऊन पाहुणचार घेऊन जातात. मात्र, यंदा थंडीत सातत्य नसल्याने दोन महिने आधीच स्थलांतरित पक्ष्यांनी घराचा रस्ता पकडला आहे. बहुतांश पक्षी परतीच्या मार्गावर निघाल्याने, वातावरण बदलाचा हा संकेत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात २७२ हून अधिक जातीचे पक्षी येतात. त्यामध्ये १०० हून अधिक जातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. दरवर्षीप्रमाणे यंदा गेल्या नोव्हेंबर महिन्यात या पक्ष्यांचे आगमन अभयारण्यात झाले. मात्र, डिसेंबर संपत नाही, तोच या पक्ष्यांनी घरचा रस्ता पकडल्याने, पक्षिमित्रांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्व सायबेरियातील थापट्या, उत्तर युरोपचा तलवार बदक, सायबेरियामधूनच येणारा क्रौंच, रशिया आणि युरोपचा पट्ट कादंब, हिमालय आणि उत्तर युरोपमधून येणारा चक्रांग बदक, हिमालयातील नकटा, पूर्व युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील नयनसरी बदक आदी पक्षी परतीच्या मार्गावर निघाले आहेत.

या पक्ष्यांनी अभयारण्याकडे फिरवली पाठ
रोहित, चतुरंग बदक, निळ्या शेपटीचा वेडा राघू, करकरा क्रौंच, बेलोनची फटाकडी, युरेशियन कुरल, ग्रेट थिकनी, उचाट, सोन चिखला या पक्ष्यांनी यंदा अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे.

भूचुंबकीय अडथळ्यांचा परिणाम
स्थलांतरित पक्ष्यांना भूचुंबकीय अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अडथळा निर्माण होत असल्याने वसंत आणि शरद ऋतूंतील पक्ष्यांच्या स्थलांतरात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. स्थलांतरित पक्षी दर अंतरावरील दिशा शोधण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात. मात्र, सौरज्वाला व इतर घटनांमुळे चुंबकीय क्षेत्रात बदल झाल्याने पक्ष्यांना दीर्घ अंतराचा प्रवास करण्यात अडथळे येत आहेत. त्यातच ऋतुचक्रातील बदलांमुळेही पक्ष्यांच्या मुक्कामांवर परिणाम होत असल्याचे पक्ष्यांच्या अचानक परतीच्या मार्गामुळे बोलले जात आहे.

The post यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी appeared first on पुढारी.