लासलगाव : पुढारी वृत्वृतसेवा- नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. नेदरलँड या देशामध्ये द्राक्ष निर्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. जानेवारी महिन्यात द्राक्ष निर्यातीचा वेग थोडा कमी होता. मात्र आता युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढल्यामुळे द्राक्ष निर्यातीचा वेग वाढला आहे. २५३४ कंटेनरमधून ३४ हजार ५० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातुन ६७९६ कंटेनरमधून ९० हजार ४९४ मॅट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली होती.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला आता जोरदार सुरवात झाली असून, निर्यातीचे कंटेनर मोठ्या प्रमाणावर युरोपियन देशात रवाना होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून ४४ हजार १९० हेक्टर द्राक्षबागेची लागवड झाली असून, सर्वाधिक ४४ हजार १७७ हेक्टर लागवड महाराष्ट्रातून झाली आहे. द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात २३ हजार १७१ हेक्टर लागवड झाली आहे.
या हंगामात द्राक्ष निर्यातीला जानेवारी महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातुन सुरवात झाली. जानेवारी महिन्यात २५३४ कंटेनरमधून ३४ हजार ५० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात आहे. नेदरलँडला ३३ हजार ६०२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली त्यापाठोपाठ स्वित्झर्लंड, स्वीडन, रोमोनिया या ठिकाणी सुद्धा नाशिकची गोड रसाळ द्राक्ष पोहचली आहे. मार्च महिन्यात युरोपियन देशात द्राक्षाची निर्यात अजून वाढेल असा प्राथमिक अंदाज द्राक्ष उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन २०२२-२३ हंगामात तब्बल २ लाख ६७ हजार ९५० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २५४३ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले होते. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे द्राक्षाची गोडी वाढणे, द्राक्षाचा रंग आणि आकार वाढीस या पोषक वातावरणाची मदत होत आहे. त्यामुळे द्राक्षाची मागणी वाढत आहे.
द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाई या अडथळ्यांवर मात करीत द्राक्ष पंढरीतील जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे. – संजय गवळी, द्राक्ष बागायतदार, खडक माळेगाव
देशाचा द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढता
२०१७-१८ १८८२२१ मेट्रिक टन १९०० कोटी
२०१८-१९ २४६१३३ मेट्रिक टन २३३५ कोटी
२०१९-२० १९३६९० मेट्रिक टन २१७७ कोटी
२०२०-२१ २४६१०७ मेट्रिक टन २२९८ कोटी
२०२१-२२ २६३०७५ मेट्रिक टन २३०२ कोटी
२०२२-२३ २६७९५० मेट्रिक टन २५४३ कोटी
हेही वाचा :
- Stock Market Updates | बाजारात रोजच ‘रेकॉर्डब्रेक’ तेजी! निफ्टीवर ‘हे’ स्टॉक्स आघाडीवर
- Chhagan Bhujbal : जरांगे यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली आहेत
- चीनमध्ये झेपावली पहिली स्वयंचलित फ्लाईंग टॅक्सी!
The post युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढली, नाशिकमधून निर्यात appeared first on पुढारी.