दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’

मिलिंद सजगुरे

नाशिक : शिंदेंची शिवसेना, भाजप की, राष्ट्रवादीचा ‘दादा’ गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या महायुती उमेदवाराचा नाशिकमधील शोध अजूनही अव्याहत सुरूच आहे. इथला गड विक्रमी मतांनी सलग राखलेल्या हेमंत गोडसे यांच्याऐवजी कोण, या यक्षप्रश्नाचे उत्तर दिल्लीतील ‘चाणक्या’ने मुक्रर करूनही परिपूर्ण उमेदवाराचा शोध संपत नसल्याने अवघ्या महायुतीत गोंधळाचे वातावरण आहे. खात्रीलायक माहितीनुसार, राज्यातील ‘दादा’ गटाचे हेविवेट मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाशिकसाठी जवळपास निश्चित झाले असून, ते शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे यांच्यासोबत दोन हात करतील.

नाशिकमधील निवडणूक उमेदवारी आणि पराभव याबद्दल भुजबळ अनभिज्ञ नाहीत. ज्या गोडसेंचा पत्ता कट करून भुजबळांना मैदानात उतरवण्याचा सध्या घाट घातला जात आहे, त्यांनीच आधी स्वतः भुजबळ आणि तद्नंतर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मोठ्या मताधिक्क्याने चीतपट करण्याचा विक्रम नोंदवला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भुजबळ यांच्याविरोधात एकवटलेला मराठा समाज हे गोडसेंच्या विजयामागील गमक समजण्यात येते. आता तर त्यापेक्षाही स्फोटक परिस्थिती असताना छगन भुजबळ यांच्या स्वकथनानुसार त्यांची उमेदवारी थेट दिल्लीश्वर निश्चित करतात, हे सत्य अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरावे. किंबहुना, अलीकडील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका पाहता, त्यांच्या उमेदवारीतून महायुती पायावर धोंडा पाडून घेईल, अशा प्रतिक्रिया स्वकीयांमधूनच उमटत आहेत. नाशिक शहरातील तीन आणि देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी या विधानसभा क्षेत्रांचा नाशिक मतदार संघांमध्ये समावेश होतो. याचा अर्थ अर्धा मतदारसंघ शहरी आणि तेवढाच ग्रामीण भागात येतो. दोन्ही भागांत मतदारांची पसंती मिळवताना उमेदवाराची दमछाक होते.

अजून अंतिम उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नसले, तरी भुजबळ यांच्या नावाचा गवगवा सुरू ठेवून, गोडसेंसह सर्व इच्छुकांची, आपला पत्ता कापल्याची मानसिकता तयार करण्याची महायुतीच्या धुरंधरांची रणनीती दिसते. निवडणूकपूर्व वावड्या एक बाब अधोरेखित करत होत्या, ती म्हणजे भुजबळ यांचा भाजप प्रवेश करून घेऊन त्यांना राज्यसभेवर घेण्याचा घाट घातला जात आहे. या कृतीतून, भाजपला भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर ‘प्रोजेक्ट’ करून ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करावयाचे आहे. भाजपची अलीकडील चाल पाहता, आधीची ती वावडी नव्हती, तर राजकीय डावपेचांचा भाग होता, हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीतही भुजबळ यांना नाशिकच्या मैदानात उतरवण्याचे दिल्लीश्वरांनी निश्चित केल्याचे सांगण्यात येते. ‘ओबीसींचे मसीहा’ हे बिरूद मिरवणारे भुजबळ सलग मोठ्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नेमके कोणते ‘व्यवस्थापन’ आखतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान, दिल्लीश्वरांच्या आडाख्यानुसार भुजबळ यांना उमेदवारी दिली, तर राज्यभरातील ओबीसी मते भाजपकडे एकवटली जातील, असा कयास लावण्यात येत आहे.

सत्तेत असो वा नसो, भुजबळ सातत्याने चर्चेत…

राजकीय पुनर्वसनापोटी 2004 मध्ये येवला विधानसभा मतदार संघाची निवड करून छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये नव्या राजकीय इनिंगची सुरुवात केली. काँग्रेस आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शासनात ते तब्बल साडेबारा वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे भुजबळ सत्तेमध्ये असो अथवा नसो, सातत्याने चर्चेत राहिले. पालकमंत्री असताना जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची चर्चा ते सातत्याने करताना दिसतात. त्याच अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदार संघात संधी मिळाल्यास इथे विकासाची नवी पहाट उगवेल, असा दृढ विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसतात.

The post दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’ appeared first on पुढारी.