युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात

इगतपुरी अपघात, www.pudhari.news

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी भीषण अपघात झाला. या ट्रकने एका मोटार सायकलला टक्कर दिली असुन या अपघातात एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात घडली आहे.

शिवाजी विष्णू ठोके, वय ३५ वर्ष, रा. अधरवड असे अपघातग्रस्त दुर्दैवी युवकाचे नाव असून हा अपघात इतका भीषण होता की युवकाच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. विशेष म्हणजे या युवकाच्या शरीराचा अर्धा भाग वीस ते पंचवीस फुटावर फरपटत नेला होता. यावेळेस ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले. अपघातस्थळी वाहतुकीची कोंडी झाल्यावर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलीस पोहचल्यावर वाहतुक सुरळीत करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये घोटी ग्रामीण महामार्गचे पोलीस कर्मचारी किरण आहेर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या संशयतांचा शोध घेत होते.

हेही वाचा :

The post युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुढारी.