राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल

न्यायालय www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेतून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच भिक्षुकांना बेदमपणे मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणात आज सत्र न्यायाधीश एफ. ए. एम ख्वाजा यांनी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात 1 जुलै 2018  रोजी घडली होती.

मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असणारे दादाराव शंकरराव भोसले (वय 47), भारत शंकर भोसले (वय 45), राजू मामा उर्फ श्रीमंत भोसले (वय 45), भारत शंकर माळवे (वय 45) सर्व राहणार खवे, तालुका मंगळवेढा व अगनू श्रीमंत इंगोले (वय 22) राहणार मानेवाडी हे भिक्षुक साक्री तालुक्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यामुळे हे सर्व पाच परिवार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नजीक एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माळाराणावर साडीचा तंबू करून राहत होते. ग्रामीण भागामध्ये भविष्य सांगण्याच्या नावाखाली हे आपल्या उदरनिर्वाहाचे काम करीत होते. दिनांक 1 जुलै 2018 रोजी हे पाचही जण साक्री तालुक्यातील काकरपाडा आणि राईनपाडा या गावात जाण्यासाठी निघाले. दोन दिवसानंतर त्यांचा मुक्काम पिंपळनेर येथून हलणार होता. यानंतर ते त्यांच्या मूळ गावी जाणार होते. मात्र ही शेवटची वेळ आहे असे त्यांच्या परिवाराला सांगून ते निघाले. मात्र काळाच्या उदरात वेगळेच दडलेले होते. साक्री तालुक्यातील राईनपाडा परिसरात गेल्या आठवड्यापासून तालुक्यात मुले पळवणारी टोळी आली असून ते किडनी विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची अफवा पसरली होती. त्यातच हे पाचही भिक्षुक राईनपाडा गावात पोहोचले. यावेळी गावात बाजार असल्यामुळे मोठी गर्दी होती. या गर्दीमध्ये हे भिक्षुक वेगळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना हटकले. विशेषता त्यांच्यावर मुले पळवणारी टोळी असल्याचा आरोप करीत त्यांना मारहाण करीत राईनपाडा येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी त्यांना काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडवण्याऐवजी भावना शून्य असलेल्या अनेकांनी त्यांना मारहाण करीत असल्याचे चित्रण आपल्या मोबाईल मध्ये केले. मदतीच्या आर्त किंकाळ्या मारणाऱ्या या सर्व भिक्षुकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काही क्षणातच या पाचही जणांचा मृत्यू झाला. विशेषता मदतीसाठी पोहोचलेल्या पिंपळनेर पोलिसांना देखील जमावाने गावामध्ये शिरू दिले नाही. त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक रामकुमार यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे आणि पोलीस दल हे बळाचा वापर करून राईनपाडा गावात पोहोचले. यावेळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रक्तमासाचा चिखल पाहून प्रत्येकाला गहिवरून आले. पाचही मयत भिक्षुकांना पिंपळनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. या दरम्यान त्यांच्या परिवाराला देखील ही माहिती मिळाल्याने रुग्णालयाच्या आवारात झालेला आक्रोश पाहून तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची डोळे पाणावले. मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी स्वीकारली. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच नाशिक विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजें यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या समोर देखील मोठा पेच निर्माण झाला. अखेर भिक्षुकांना बेदम मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्याने या व्हिडिओ आणि फोटोच्या आधारावर जमावाच्या विरोधात भादवी कलम 302, 143, 144, 147 ,148, 149, 336, 332 ,363 ,364, 141 ,341, 342 ,353, 427 ,506, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अशा वेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हा दाखल झाला. यातील काही जणांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर भिक्षुकांचे मृतदेह हे त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.

35 साक्षीदार तपासले, पाच साक्षीदार फितूर

या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी केला यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश एफ ए एम ख्वाजा यांच्या समोर चालले. तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ऍड निकम यांनी 35 साक्षीदार तपासले. यातील पाच साक्षीदार फितूर झाले होते. तर महत्त्वाच्या काही साक्षीदारांनी आरोपींनाच ओळखले नव्हते. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे आणि अन्य आधारावर ऍड उज्वल निकम यांनी प्रभावीपणे न्यायालयात पुरावे मांडले. त्यानुसार आज हा खटला निकालावर ठेवण्यात आला होता.

न्यायदान कक्षात गर्दी

न्यायालयात आज राईनपाडा खटल्याचा निकाल लागणार असल्याने न्यायदान कक्षात विधीज्ञांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती तर आरोपी हजर होते. मात्र जामिनावर असणारा काळू सोमा गावीत हा आरोपी आज न्यायालयात आलाच नाही. ही माहिती ॲड निकम यांनी सत्र न्यायाधीश ख्वाजा यांना दिली. यानंतर दुपारी न्यायालयात निकाल पत्राचे वाचन करण्यात आले. यात न्यायालयाने महारु ओंकार पवार, दशरथ पिंपळसे, हिरालाल गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज चौरे, मोतीलाल साबळे व काळू सोमा गावित यांना दोषी असल्याचे स्पष्ट केले. शिक्षे विषयी न्यायालयाने न्यायदान कक्षात उपस्थित असलेल्या आरोपींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. यातील आरोपींनी ते परिवाराचा आधार असून न्यायालयाने सहानुभूती दाखवावी, असे स्पष्ट केल्यानंतर न्यायाधीश ख्वाजा यांनी निकाल जाहीर केला. यात सर्व सात आरोपींना खुनाच्या कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. तर उर्वरित कलमात एक वर्ष ते दहा वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्या. या सर्व शिक्षा आरोपींना एकाच वेळी भोगायच्या आहेत. दरम्यान दोषी ठरलेला काळु गावीत याला न्यायालयाने पकड वारंट काढले आहेत.

सोशल मीडिया संदर्भात न्यायालयाचे निरीक्षण- ॲड उज्वल निकम

या निकाला संदर्भात न्यायालयाने नोंदवलेल्या निष्कर्ष आणि शिक्षेची माहिती विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी दिली. या खटल्यातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. समाज माध्यमांमध्ये खोट्या बातम्या आल्याने जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊन काय होऊ शकतो. ही बाब राईनपाडा घटनेतून दिसून आली आहे. या गैरसमजाचे पर्यावसनातून पाच जणांना जीव गमवावा लागला. खोटी बातमी दाखवली .तर जनतेचे मत कलुषित होते .यातून मंगळवेढा तालुक्यात राहणाऱ्या भिक्षुकांना जीव गमवावा लागला आहे. मोबाईलच्या माध्यमातून खोट्या अफवा पसरवल्या गेल्या. साक्री तालुक्यात मुले पळवणारी टोळी आली असून मुलांच्या किडन्या विकण्याचा धंदा चालू असल्याचा गैरसमज पसरवला गेला. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या भिक्षुकांना बेदम मारहाण झाली. अशी घटना निंदनीय आहे .असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत सात जणांना शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील एका आरोपीने आत्महत्या केली होती. तर उर्वरित 20 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. मात्र निर्दोष मुक्त करीत असताना न्यायालयाने अशा प्रकारे स्वतः बेकायदेशीरपणे न्याय करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कायदा हातात न घेण्याची सूचना देखील न्यायालयाने यावेळी केली. विशेषता भिक्षुकांना मारहाण करीत असताना त्याचे चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण समाज माध्यमात पसरले. याबाबत न्यायालयाने आपले विशेष निरीक्षण नोंदवले .शिक्षेच्या युक्तिवादात आपण आरोपींनी पाच जणांना मारले. मात्र निर्दोष व्यक्तींची हत्या करणारे या घटनेचा समाज मनावर परिणाम होणार आहे .त्यामुळे समाजावर वचक असला पाहिजे .म्हणूनच आरोपींना जन्मठेप देण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे मयत हे गरीब परिवारातील असल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात आली. न्यायालयाने शिक्षा सुनावत असतानाच मयत भिक्षुकांच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे .या खटल्याच्या कामात धुळ्याचे जिल्हा सरकारी वकील ऍड देवेंद्रसिंह तवर यांच्यासह ऍड गणेश पाटील तसेच तपास अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस अधिकारी श्रीकांत पाटील यांच्यासह अनेकांनी मदत केल्याची माहिती देखील ऍड उज्वल निकम यांनी यावेळी दिली.

The post राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल appeared first on पुढारी.