नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर प्रचारावेळी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)
गेल्या काही वर्षांत निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा नवीन फंडा समोर आला आहे. त्यामुळे आयोगाने अशा प्रचारासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यानुसार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचा तपशील देणे बंधनकारक असेल. तसेच उमेदवार व राजकीय पक्षांनी सोशल मीडियाद्वारे केलेला जाहिरातींवरील खर्च त्यांच्या खर्चाचे हिशोबात दाखविणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेशाबाबत आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत. इलेक्ट्रॅानिक मीडियावरील प्रचार जाहिरातीसाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची मान्यता घेऊन अशा जाहिराती प्रसारित करणे आवश्यक आहे. या समितीची प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींवर करडी नजर असेल, असे शर्मा यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)
जिल्हास्तरावर सेल
जिल्हास्तरावर मीडिया सेल कार्यान्वित करण्यात येत असून, पोलिस सायबर विभागाचे तज्ज्ञ अधिकारी या सेलमध्ये कार्यरत असतील. या सेलचे सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीवर लक्ष असेल. सोशल मीडियाद्वारे मानहानीकारक संदेश पाठवणे, धार्मिक भावनांना धक्का पोहोचवणारे, भावना भडकावणारे, समाजातील शांतता, एकोप्यास तडा देणारे विघातक संदेश पाठवणे आदी समाजविघातक बाबींवर या सेलचे विशेष लक्ष असेल.
प्रचारावेळी भान राखावे (Lok Sabha Election 2024)
राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदारांना जात, धर्मावर आधारित मतदान करण्याबाबत आवाहन करता येणार नाही. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे, पूजास्थळांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येणार नाही. सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या जाहिरातीद्वारे असभ्य भाषा व मानहानीकारक भाषा वापरून निवडणूक प्रचार करता येणार नाही याची नोंद घ्यावी, अशाही सूचना शर्मा यांनी केल्या आहेत.
हेही वाचा :
- Lok Sabha polls 2024 | ब्रेकिंग! लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची उद्या घोषणा
- धुळे लोकसभा मतदारसंघातील भावी खासदारांचे स्वप्न भंगले, सुभाष भामरेंना तिसऱ्यांदा उमेदवारी
- आजी-आजोबांचीही रविवारी होणार परीक्षा!
The post राजकीय पक्षांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर ठेवणार 'वॉच' appeared first on पुढारी.