नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय…

गिरीश महाजन, श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार असून विद्यमान खासदार ज्या पक्षाचा असेल, त्याच पक्षाला जागा साेडण्याचा निर्णय महायुतीत झाला आहे. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता असून नाशिकच्या जागेबद्दल राज्यातील वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतील, असे सूचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाजनांच्या वक्तव्यानंतर नाशिकमधील उमेदवाराचा सस्पेंन्स वाढला आहे. कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एैकायला सोडा, पण पाहायलादेखील लोक येत नाही, अशा शब्दांत महाजन यांनी गांधीवर टीका केली. (Lok Sabha Election 2024)

सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मंत्री महाजन हे गुरुवारी (दि.१४) नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेनाच लढविणार अशी घोषणा केली. याबाबत महाजन यांचे लक्ष वेधले असता महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. महायुतीत विद्यमान खासदार असलेल्या जागी तोच पक्ष निवडणूक लढेल, असा फार्म्युला ठरला आहे. पण त्याचवेळी काही ठिकाणी उमेदवार बदलला जाऊ शकतो, असे सांगत नाशिकचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेच घेतील, असे महाजन म्हणाले. त्यामुळे नाशिकची जागा सेनेला सुटणार हे निश्चित झाले असले तरी उमेदवार बदलला जाऊ शकतो. (Lok Sabha Election 2024)

खा. गांधी यांच्या भारत न्याय यात्रेवर टीका करताना राष्ट्रीय पक्षाचा नेता एखाद्या नगरसेवकाप्रमाणे चाैक सभा घेतात. परंतु, गांधी यांच्यासह खा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. गांधी हे मुंबईत पोहचेपर्यंत कॉग्रेसचे आणखीन काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट यावेळी महाजन यांनी केला.

केंद्रीय समिती घोषणा करते

राज्यातील जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्यात असून महायुतीचे धोरण ठरले आहे. भाजपामध्ये उमेदवार निवडीबाबत राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर केंद्रीय पातळीवर नावे पाठविली जातात. त्यानंतर केंद्रीय समिती एका नावावर शिक्कामोर्तब करुन उमेदवार घोषित करते. त्यामुळे कोणाचा तिकिट कापले जाणार व कोणाला उमेदवारी मिळणार हे सांगणे कठीण आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत भाजपाने त्यांचे पुर्नवसन केले का या प्रश्नावर महाजन यांनी त्या आमच्या नेत्या असून यापूर्वी त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या असल्याचे सांगितले.

आठही जागा जिंकणार

गेल्या निवडणूकीत शब्द दिला त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या. यंदाही आठ ही जागा मोठ्या मत्ताधिक्याने जिंकुन दाखवले असे सांगत राज्यात उत्तर महाराष्ट्र नंबर एकवर असले, असा दावा मंत्री महाजन यांनी केली. जळगावला विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापण्यामागे आपली नाराजी असल्याचा इन्कार यावेळी महाजन यांनी केला.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय... appeared first on पुढारी.