राजसाहेब, आपणच नाशिकच्या मैदानात उतरा ; कार्यकर्त्यांची पत्राद्वारे गळ

राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराविषयी दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. या मतदारसंघात इच्छुक उदंड असून, त्यात दररोज नव्या नावांची भर पडत आहे. आता चक्क मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव चर्चेत आले आहे. होय, मनसैनिकांनीच राज ठाकरे यांना नाशिक लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातली आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीसाठी आणखी एक नाव पुढे आले आहे.

उमेदवारीवरून राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांमध्ये नाशिकचे नाव घेतले जात आहे. कारण या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेलेले नाही. याशिवाय दररोजच नवनवी नावे समोर येत असल्याने तिढा वाढतच आहे. आता चक्क मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नावाची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मनसे महायुतीत सहभागी होण्याचे जवळपास निश्चित झाले असून, मनसेकडून नाशिकसह दक्षिण मुंबई आणि शिर्डी अशा तीन जागांच्या मागणीचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला आहे. नाशिकची जागा जर मनसेच्या पारड्यात पडली, तर मनसेची उमेदवारी राज ठाकरे यांनीच करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी राज यांना पत्र लिहिले असून, त्यात नाशिकची उमेदवारी करण्याचा आग्रह केला आहे. पत्रात म्हटले आहे की, मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकमधून १२ नगरसवेक निवडून आले होते. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये नाशिक शहरात ४० नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य व ग्रामीण भागात १५ नगरसेवक अशी मनसेची विजयी घोडदौड झाली होती. त्यावेळी लाेकसभेचे मनसेचे नवखे उमेदवार हेमंत गोडसे यांचा निसटता पराभव झाला होता. पक्षाची पुढील वाटचाल जोमाने झाली. (Raj Thackeray)

नाशिकनगरीत मनसेचा महापौर झाला असता, तत्कालीन राज्य सरकारकडून निधी मिळणे दुरापास्त झाले होते. अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. पाच वर्षांत तीन वर्षे आयुक्त नव्हते, तरीसुद्धा राज ठाकरेंनी विविध विकासकामे केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, संदीप भवर, किरण क्षीरसागर, संदीप जगझाप, रोहन जगताप, विजय ठाकरे, संजय देवरे, नितीन धानापुणे, महेंद्र डहाळे आदी मनसैनिकांनी लवकरच राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नाशिकच्या जागेसाठी आग्रह करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Raj Thackeray)

…तर अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी 

मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मनसेची पालिकेतील सत्ता गेल्यानंतर शहरातील रस्त्यांची वाट लागली असून, जनता हैराण झाली आहे. हा राग मतदान यंत्रातून व्यक्त होईलच. त्यामुळे नाशिकमधून खुद्द राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी व नाशिकसह महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करावे, अशी इच्छा पत्राद्वारे मनसैनिकांनी व्यक्त केली.

पक्षप्रमुख राज ठाकरे हे लोकसभेबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, त्यात नाशिकची जागा त्यांनी किंवा अमित ठाकरे यांनी लढवावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. नाशिकचा विकास करण्यास मनसेची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यावेळी शहरासह, ग्रामीण भागातूनदेखील मनसेला कौल मिळाला होता. त्यामुळे भौगोलिक परिस्थिती बघता, नाशिकच्या जागेवर मनसेचा हक्क असून, आयात उमेदवारापेक्षा राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनीच जागा लढवून नाशिकचा विकास साध्य करावा. – संदीप भवर, प्रदेश उपाध्यक्ष, मनविसे

——-०——–

हेही वाचा –

The post राजसाहेब, आपणच नाशिकच्या मैदानात उतरा ; कार्यकर्त्यांची पत्राद्वारे गळ appeared first on पुढारी.