नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आतापर्यंत देशात प्रश्नांवर निवडणुका झाल्या. उत्तरांवर होणारी आगामी लोकसभा निवडणूक बहुधा पहिलीच असावी. मात्र, राम मंदिर झाल्याचे समाधान असले, तरी मी भाजपचा मतदार नाही. अशात राम मंदिरावरून भाजपला मतदान होईल, हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट मत, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे राम मंदिरावरून भाजपकडून केल्या जात असलेल्या प्रचाराच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, जोपर्यंत मतदान होत नाही, तोपर्यंत काहीच सांगता येत नाही. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. याचे शाश्वत ठोकताळे नसतात. कोणाला माहिती होते की, कांद्याच्या प्रश्नावर निवडणूक होईल अन् निर्णय वेगळा येईल. त्यामुळे आताही याचा अंदाज बांधणे अवघड आहे.
आताही काय होईल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. पण जे मोठ्या प्रमाणावर मतदान होत असते, ते रागातून होत असते. बाबरी मशिदीविषयी झालेले मतदान रागातून झाले होते. त्यावेळी काँग्रेसच्या मतदारांनीदेखील भाजप-सेनेला मतदान केले होते. २०१४ मध्येदेखील रागातून मतदान झाले होते. १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक मतदारांनी दंगल अन् बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेनेला मतदान केले होते. मात्र, यावेळी प्रथमच समाधानातून मतदान होणार आहे. आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या, त्या प्रश्नांवर झाल्या. उत्तरांवर बहुधा ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे समाधानातून किती मतदान होणार, हे सांगणे अवघड आहे. कारण राम मंदिर झाल्याचा मला आनंद आहे. मात्र, मी भाजपचा मतदार नसल्याने, भाजपला मतदान करणार नसल्याचेही राज यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएमवर बोलणार नाही
गेल्या वेळी जेव्हा मी ईव्हीएमवर बोलत होतो, तेव्हा मला कोणीही साथ दिली नव्हती. आता तेच बदलत आहेत. त्यांनीच आता यावर बोलावे, असेही राज यांनी स्पष्ट केले.
The post राम मंदिराचे समाधान; पण मतदारांविषयी साशंकता appeared first on पुढारी.