रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’

रावसाहेब दानवे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसल्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असा दावा करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’ टाकला आहे.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात असल्याचे म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतदारसंघाचा दानवेंनी उल्लेख केला आहे. थोड्याच वेळात याबाबत डिटेलमध्ये बोलतो, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या बीड येथील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रम आहे. पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे, असा प्रश्न कायम असताना दानवे यांनी यावरही भाष्य केले आहे. खासदार प्रीतम मुंडे, डॉक्टर भागवत कराड आणि माझी देखील उमेदवारी नक्की नाही, भाजपात पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो, असे सांगून उमेदवारी बाबतचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला आहे.

हेही वाचा:

The post रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये 'चिठ्ठी बॉम्ब' appeared first on पुढारी.