मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– सध्या भारतात महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे. त्यात राहुल गांधींची २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, अशी टीका करतानाच, आपल्या विकासाच्या गाडीचे इंजीन मोदी आहे. सर्वांना घेऊन विकासाची गाडी पुढेही अशीच सुरू ठेवण्यासाठी देशाला नरेंद्र मोदी यांची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
काय म्हणाले फडणवीस ?
- देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे.
- विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही
- राहुल गांधींची २४ पक्षांची खिचडी आहे.
महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील ऋषी वाल्मीकी स्टेडियमवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, संजय पवार, फरहान खान यांच्यासह शिवसेना, भाजप, रिपाइं, मनसे यांसह महायुतीतील घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मनमाड बायपासचा प्रश्न सोडविणार
फडणवीस म्हणाले की, मनमाडची ओळख रेल्वेचे शहर म्हणून आहे. आमदार कांदे यांनी या शहरासाठी बायपासची मागणी केली आहे. निवडणूक संपल्यानंतर या मागणीकडे विशेष लक्ष देऊन मनमाड बायपासचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
फडणवीसांमुळेच विकासकामे झाली
आमदार कांदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मतदारसंघात विकासकामे झाली. पंकजा मुंडे आणि खासदार डाॅ. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संयोजन महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले होते.
हेही वाचा –