नंदुरबार : कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून संबोधले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासींना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. परंतु, मोदी सरकारने आदिवासीविरोधी कायदे करून त्यांना न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात ही यात्रा आल्यावर तिला आदिवासी न्याय यात्रा म्हणून संबोधणार असल्याचे माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेविषयी अधिक माहिती देताना सांगितले.
भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार नाईक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संदीपनाथ, जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, दिलीप नाईक, पंडितराव पवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, खासदार राहुल गांधी व इतर मोठे काँग्रेस नेते येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
आमदार के. सी. पाडवी यांनी माहिती देताना सांगितले, खासदार राहुल गांधी हे दिल्लीहून विमानाने सुरत येथे येतील. नंतर भारत जोडो न्याय यात्रा ही १० मार्च रोजी गुजरातमधील सोनगड येथे येणार आहे. १२ मार्च रोजी यात्रा नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. यात्रा नवापूरमार्गे थेट नंदुरबारात दाखल होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने थेट नंदुरबारात दाखल होतील. पोलिस अधीक्षक कार्यालयातील कवायत मैदानावरून ते वळण रस्त्याने सीबी ग्राऊंडवर येतील. हेलिपॅड अर्थात पोलिस अधिक्षक कार्यालय ते सी.बी. ग्राऊंड या दरम्यान रॅली काढली जाणार आहे. यावेळी खासदार राहुल गांधी यांचा रोडशो करायचा किंवा कसा याबाबत निश्चित झालेले नाही. आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन या दरम्यान घडवले जाईल व पारंपरिक नृत्य करणारे विविध नृत्य पथके सहभागी होणार असून पारंपारिक वाद्यांद्वारे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. शेवटी मोदी ग्राऊंड तथा सीबी ग्राऊंडवर खासदार राहुल गांधी जनतेला संबोधित करतील. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, आर. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात आदींसह विविध नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर यात्रा दोंडाईचाकडे प्रस्थान करेल. दौडाईचा, धुळे, मालेगाव, नाशिकमार्ग मुंबईला पोहोचणार असून, तेथे यात्रेचा समारोप होईल, असे माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Nashik News : जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने
- राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर आता शहरात सुरू करणार ‘नागरी बाल विकास केंद्रे’
- Ind vs Eng 5th Test Day 3 : इंग्लंडला दुसरा झटका; झॅक क्रॉली बाद
The post राहूल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, 'आदिवासी न्याय'... appeared first on पुढारी.