नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिनाभरापासून उत्सुकता ताणलेल्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी (दि. १६) घोषित झाल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, निवडणुकीच्या दृष्टीने तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे.
देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे किती टप्पे असणार, कोणत्या दिवशी मतदान असेल, अशा विविध बाबींवरून राजकीय पक्षांसोबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येत आहे. त्याचवेळी निवडणुकांची घोषणा होणार असल्याने जिल्हा प्रशासन झाडून तयारीला लागले आहे. जिल्ह्यात लाेकसभेचे नाशिक व दिंडोरी असे दोन तसेच धुळे-मालेगाव अर्धा मतदारसंघ मोडतो. निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध समित्या गठीत केल्या आहेत. त्यामध्ये ईव्हीएम सुरक्षा, आवश्यक मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, मीडिया, खर्चावर देखरेखीसाठी पथके अशा निरनिराळ्या पातळीवर या समित्या आहेत. प्रत्येक समितीसाठी एक नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. निवडणुकांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून समित्यांचा आढावा घेतला जात आहे. तसेच कुठे त्रुटी आढळल्यास ती तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात सुमारे २८ हजार अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. पंधराही विधानसभा मतदारसंघनिहाय संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाविषयीचे दोन ते तीन प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष मतदानापर्यंत आणखीन दोन प्रशिक्षण शक्य आहे.
The post लाेकसभा निवडणूक : तयारीवर अंतिम हात; उत्सुकता शिगेला पोहोचली appeared first on पुढारी.