लाेकसभेसाठी फरफट : प्रशासनाची असून अडचण, नसून खोळंबा

godown www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी

जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील गोदामात अतिरिक्त हॉलसाठी महसूल प्रशासनाने दोन एकरचा भूखंड अतिरिक्त भूखंड उपलब्ध करून दिला आहे. पण, या हॉलच्या मंजुरीसह उभारणीसाठी किमान वर्ष जाणार आहे. त्यामुळे हक्काचे गोदाम असतानाही लोकसभेच्या मत मोजणीकरिता तात्पुरत्या जागेचा शाेध घेण्याची वेळ ओढवल्याने, असून अडचण नसून खोळंबा अशीच काहीशी परिस्थिती निवडणूक प्रशासनाची झाली आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष झाडून कामाला लागले आहेत. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. मतदार याद्या प्रसिद्धीपासून ईव्हीएम तयार ठेवणे, मतदान केंद्र निश्चिती, अधिकारी-कर्मचारी नियुक्ती तसेच अन्य तयारीवर प्रशासनाकडून हात फिरवला जात आहे. परंतु, एकीकडे तयारीचा श्रीगणेशा झाला असताना, नाशिक व दिंडोरी या दोन्ही लाेकसभा मतदारसंघांतील मतमोजणीचा यक्षप्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे.

निवडणूक शाखेचे सय्यद प्रिंपी येथे हक्काचे गोदाम आहे. त्या ठिकाणी मतमोजणीसाठी प्रशस्त हॉल, ईव्हीएम जतन करण्यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, या गोदामात जिल्ह्यातील एकाच लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शक्य आहे. त्यामुळे उर्वरित एका मतदारसंघाच्या मतमोजणीचा मुद्दा कायम आहे. वास्तविक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, हक्काचे गोदाम असूनही अपुऱ्या जागेमुळे जिल्हा निवडणूक शाखा अडचणीत आली आहे. त्यामुळे या सर्वांवर पर्याय म्हणून सय्यद पिंप्री येथून ईव्हीएम व मतदान साहित्याचे वितरण करायचे, तर पूर्वापारनुसार अंबडच्या केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्याच्या पर्यायाचा विचार निवडणूक शाखा करते आहे.

राज्यातील पथदर्शी प्रकल्प
केंद्र सरकारने देशात प्रत्येक जिल्ह्यात स्वमालकीचे निवडणूक गोदाम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्वप्रथम सय्यद पिंप्री येथे पाच एकर जागेवर निवडणूक शाखेचे गोदाम उभे राहिले. या गोदामात मतमोजणी हॉल, सिक्युरिटी केबिन, ईव्हीएम स्ट्राँगरूम, अधिकारी कक्ष आदी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यासाठी हे गोदाम म्हणजे पथदर्शी प्रकल्प ठरले आहे.

‘पदवीधर’ला मर्यादा उघड
सय्यद प्रिंपी येथील गोदामात २०२३ ला नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट असलेल्या त्या निवडणुकीत जागेच्या उपलब्धतेवरून प्रशासनाच्या मर्यादा उघड झाल्या. त्यानंतर गोदाम परिसरात अतिरिक्त हॉलचा मुद्दा पुढे आला. त्यानूसार निवडणूक शाखेने या हॉलच्या दोन एकर जागेकरिता महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानूसार चालू महिन्याच्या प्रारंभी जागा उपलब्ध झाली. परंतु, हॉलसाठीचा निधी, बांधकाम परवानगी, सोयीसुविधा आदींबाबतचा प्रस्ताव थंड बस्त्यात आहे. त्यामुळे स्वमालकीच्या गोदामात लोकसभेची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या स्वप्नांना प्रशासनाला मुरड घालावी लागेल.

हेही वाचा:

The post लाेकसभेसाठी फरफट : प्रशासनाची असून अडचण, नसून खोळंबा appeared first on पुढारी.