नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांसाठी सोमवारी (दि. २०) मतदान पार पडले. सर्व मतदान पार पडल्यानंतर बंदोबस्तात ईव्हीएम अंबडच्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँगरूममध्ये सीलबंद करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी मंगळवारची (दि. २१) दुपार उजाडली. मात्र ईव्हीएमच्या प्रतीक्षेत अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, 4 जूनला मतमोजणी वेळीच स्ट्राँगरूम उघडण्यात येतील.
जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये किरकोळ प्रकार वगळता, शांततेत मतदान पार पडले. उन्हाचा तडाखा लक्षात घेता, दुपारी 4 नंतर मतदारांनी केंद्रांसमोर गर्दी केली. परिणामी सायंकाळी 6 नंतरही अनेक केंद्रांसमोर रांगा लागलेल्या होत्या. नाशिक शहरातील मखमलाबाद केंद्र, चांदवड तालुक्यातील वडाळीभोई, पेठ तसेच दिंडोरी येथील प्रत्येकी एका केंद्रावर रात्री 8.30 पर्यंत मतदान सुरू होते. मतदारांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नाशिकमध्ये अंतिमत: ६०.७५, तर दिंडोरीत ६६.७५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरील सील केलेले ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्स त्या-त्या विधानसभा मतदारसंघांतील स्ट्राँगरूममध्ये एकत्रित करण्यात आले. तेथून हे सर्व मशीन्स अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात बंदोबस्तात पोहोचले. नाशिक मतदारसंघातील पहिली विधानसभा मतदारसंघाची ईव्हीएम रात्री 12.30 ते 1.30 च्या दरम्यान पोहोचले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित मतदारसंघांच्या गाड्या पोहोचल्या, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत निफाड विधानसभेचे ईव्हीएम पहाटे 6 वाजता गोदामात आले, तर नांदगावचे ईव्हीएम हे सरते शेवटी 10.30 वाजता पोहोचले. दाेन्ही लोकसभा मतदारसंघांतील ईव्हीएम हे महामंडळाच्या प्रत्येकी १८ बसगाड्यांमधून अंबड येथे नेण्यात आले.
अंबड येथील गोदामात नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठीच्या स्वतंत्र स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम सील करून ठेवण्यात आले. मंगळवारी (दि. २१) दुपारी 1.30 ते 2 च्या दरम्यान, स्ट्राँगरूम सील करण्यात आली. त्यानंतर आयोगाची उर्वरित प्रक्रिया 4 पर्यंत सुरू होती. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार परमेश्वर कासुळे व अमोल निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित
अंबड येथील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम सील करताना उमेदवार व त्यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे स्वस्त:, तर व महायुतीच्या डॉ. भारती पवार यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित हाेते. दरम्यान स्ट्राँगरूम सील करण्यात आली असून, तेथे थ्री-टायर सुरक्षा तैनात असणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट देत पाहणी केली. सुरक्षा व्यवस्थेत सीआरपीएफचे जवान व पोलिसांचा तैनात केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: