लोकसभा निवडणूक : शांतिगिरींना बादली, गायकरांना सिलिंडर

चिन्हांचे वाटप pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रीया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. नाशिकमधून अपक्ष लढत देणारे शांतीगिरी महाराज यांना बादली हे चिन्ह मिळाले असून वंचितचे करण गायकर यांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले.

लोकसभा निवडणूकीत महत्वपूर्ण टप्पा असलेल्या माघारीची प्रक्रीया निर्विघ्नपणे पार पडली. नाशिकमधून ३१ उमेदवार रिंगणात असून दिंडोरीत १० उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारी नंतर कोणता उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात अंतिमत: राहणार तसेच कोणत्या उमेदवाराला काय चिन्ह मिळते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. त्यानुसार दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसारच चिन्हाचे वाटप प्रशासनाकडून करण्यात आले.

चिन्ह वाटपावेळी कोणा उमेदवाराला फुगा तर कोणाला शिट्टी मिळाली आहे. याशिवाय प्रेशर कुकर, टेबल, ट्रक, जहाज, ट्रे, तुतारी, सोफा अशी विविध चिन्हांचे उमेदवारांना वाटप केले गेले. नाशिकमधून लोकसभेसाठी नशिब आजमावणारे सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांना संगणक चिन्ह मिळाले आहे. कांतीलाल जाधव यांना कोट, आपचे कैलास चव्हाण यांना किटली मिळाली आहे. अपक्ष जितेंद्र भाभे यांना बॅट ही निशाणी मिळाली आहे. माघारीनंतर आता निवडणूकीचे सारेच चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील १२ दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांचे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जावे लागणार आहे.

उमेदवार व कंसात त्यांचा पक्ष व चिन्ह असे….

नाशिक लोकसभा मतदारसंघ 
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट, धनुष्य बाण), राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट, मशाल), अरुण काळे (बसपा, हत्ती), करण गायकर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), शांतिगिरी महाराज (अपक्ष, बादली), स्वामी सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (अपक्ष, संगणक) जितेंद्र भाभे (अपक्ष, बॅट), चंद्रकांत ठाकूर (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), वामन सांगळे (धर्मराज्य पक्ष, टेबल), आरिफ मन्सुरी (अपक्ष, हिरा), दीपक गायकवाड (अपक्ष, आगपेटी), अमोल कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, प्रेशर कुकर), तिलोत्तमा जगताप (अपक्ष, खाट), यशवंत पारधी (भारतीय अस्मिता पार्टी, ऑटो रिक्षा), भाग्यश्री अडसुळ (इंडियन पिपल्स अधिकार पार्टी, फुगा), चंद्रकांत पुरकर (अपक्ष, जहाज), गणेश बोरस्ते (अपक्ष, गॅस शेगडी), सोपान सोमवंशी (अपक्ष, शिवण यंत्र), सुषमा गोराणे (अपक्ष, सोफा), कोळप्पा धोत्रे (अपक्ष, ट्रक), सचिन देवरे (अपक्ष, ट्रे), जयश्री पाटील (सैनिक समाज पार्टी, द्राक्ष), देविदास सरकटे (अपक्ष, सफरचंद), कमलाकर गायकवाड (दलित शाेषित पिछडा वर्ग अधिकारी दल, हार्मोनियम), कैलास चव्हाण (आम आदमी पार्टी, किटली), कांतीलाल जाधव (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, कोट), दर्शना मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, उस शेतकरी), झुंझार आव्हाड (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, शिट्टी), प्रकाश कनोजे (अपक्ष, इस्त्री), धनाजी टोपले (अपक्ष, रोड रोलर) सुधीर देशमुख (अपक्ष, तुतारी).

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, तुतारी वाजविणारा माणूस), डॉ. भारती पवार (भाजप, कमळ), तुळशीराम खोटरे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), किशोर डगळे (आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया, कोट), गुलाब बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, बॅट), मालती थविल (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), बाबू भगरे (अपक्ष, तुतारी), अनिल बर्डे (अपक्ष, रुम कुलर), दीपक जगताप (अपक्ष, शिट्टी), भारत पवार (बहुजन रिपब्लिकन साेशलिस्ट पार्टी, ऑटो रिक्षा).