गत ५७ वर्षातील मतदानाचा उच्चांक मोडीत काढत नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक निकालापूर्वीच नवा इतिहास घडविला आहे. १९६७ नंतर नाशिकमध्ये प्रथमच ६०.७५ टक्के भरघोस मतदान झाले असून, २०१९च्या तुलनेत यंदा सव्वा टक्के अधिक मतदान झाले. वाढलेला मत टक्का कोणाला धक्का देणार, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. या निवडणुकीतून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे ‘हॅटट्रीक’ साधतात की, महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे ‘जायंट किलर’ ठरतात, अथवा शांतिगिरी महाराज यांच्या रुपाने नाशिकमधून नवी परंपरा सुरू होते, याकडे केवळ नाशिककरच नव्हे तर, अवघ्या महाराष्ट्रजनांचे लक्ष लागले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा कमालीची चुरशीची ठरली. शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरे गटासाठी जशी ही निवडणूक अस्तित्वाची आहे, तितकीच ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या प्रतिष्ठेचीही आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अन्न नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपण नाराज नसल्याचे शेवटी सांगितले. मात्र तोपर्यंत जो ‘मॅसेज’ मतदारांमध्ये जायचा तो गेलाच. उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या इच्छूकांनीही या निवडणुकीत गोडसेंचे ‘काम’ केले. मात्र, महाविकास आघाडीतही सारे काही आलबेल नव्हते. ऐनवेळी उमेदवारी कापली गेल्याने नाराज झालेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीतच शिंदे गटात प्रवेश करत गोडसेंची साथ केल्याने महाविकास आघाडीला धक्का बसलाच. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची आर्थिक ताकदही कमी होती, हे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांच्याच लक्षात आले. येत्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत नाशिककरांनी कौल कुणाला दिला हे समोर येणारच आहे. तत्पूर्वी विधानसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी निकालाचे चित्र बहुतांशी स्पष्ट करणारी आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघ शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपचे ॲड. राहुल ढिकले आमदार असल्याने महायुतीचे उमेदवार गोडसे यांना या मतदारसंघातून अधिक पाठबळ मिळेल, हे उघड आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात ५५.३८ टक्के मतदान झाले आहे. यंदा या मतदारसंघातील मतदानाचा टक्का सरासरी गतपंचवार्षिक इतकाच राहिला आहे. २०१४ व २०१९ प्रमाणेच यंदाही या मतदारसंघातून गोडसेंना मतांची आघाडी मिळेल, अशी शक्यता आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत गोडसेंना सर्वाधिक मतांची आघाडी मिळाही होती. यंदा नाशिक पश्चिम विभागात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व अन्य पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांच्या मतांच्या आघाडीचा मार्ग रोखला. आ. सीमा हिरे यांनी गोडसेंसाठी जंग पछाडले असले तरी सातपूरमधून दिनकर पाटील यांचे गोडसेंना कितपत सहकार्य लाभले यावरही गोडसे यांचे भवितव्य ठरणार आहे. यंदा या मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले आहे.
नाशिक मध्य मतदारसंघात ५७.१५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आमदार असल्या तरी वारे वाजे यांच्या दिशेने वाहत होते हे या मतदारसंघात दिसून आले. विशेषत: जुने नाशिक सारख्या मुस्लिम बहुल भागात उत्स्फूर्तपणे झालेले मतदान गोडसे यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजविणारेच होते. अर्थात गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर सारख्या हिंदुबहुल भागात गोडसेंना बऱ्यापैकी मतदान झाले. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघात वाजे-गोडसे यांच्यात बऱ्यापैकी मतांची विभागणी होईल, असे चित्र आहे. इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे यांनी वाजे यांच्यासाठी चांगली मेहनत घेतली. माजी आमदार निर्मला गावित यांना ठाकरे गटाने उपनेतेपद देऊन वाजे यांच्या मतांचे द्वारे खुले केले आहे. इगतपुरीत ६६ टक्के मतदान झाले. अर्थात गोडसे यांनी या मतदारसंघासाठी गेल्या दोन पंचवार्षिकमधील केलेली कामे त्यांच्यासाठी कितपत उपयुक्त ठरतात हे निकालातून स्पष्ट होईलच.
सिन्नरमधील आघाडीच ठरवेल वाजेंच्या विजयाचे गणित
सिन्नर लोकसभा मतदारसंघात मराठा आणि वंजारी मतांचे प्राबल्य आहे. २०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६४.९७ टक्के मतदान झाले होते. यंदा ६९.५० टक्के मतदान झाले असून, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४.५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गत निवडणुकीत या मतदारसंघात विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सर्वाधिक मतं मिळविली होती. तर समीर भुजबळ व हेमंत गोडसे यांच्यातही मतविभागणी झाली होती. यंदा राजाभाऊ वाजे यांना सिन्नरकरांची सर्वाधिक पसंती लाभेल, असे चित्र सुरूवातीपासूनच होते. अॅड. कोकाटे हे यंदा गोडसे यांच्या बाजुने दिसत असले तरी प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवस अगोदरपर्यंत कोकाटे यांची राहिलेली अलिप्तता आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकारणाची किनार लक्षात घेता कोकाटे यांची भूमिका बरेच काही सांगून गेली. त्यामुळे सिन्नरमधून वाजे यांना सर्वाधिक मतं मिळतील, हे उघड सत्य आहे. अर्थात सिन्नरमधून वाजे जी मतांची आघाडी घेतील तीच त्यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, कारण नाशिकपूर्व, नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये गोडसे यांना मिळू शकणारी मतांची आघाडी तोडण्यासाठी वाजेंना सिन्नर मतदारसंघ हा एकमेव तारक ठरेल, असे सध्यातरी चित्र आहे..
मतदानाची आतापर्यंतची टक्केवारी
निवडणूक वर्ष मतदान (टक्केवारी)
१९५७ ४८.१३
१९६२ ५४.१८
१९६७ ६५.७९
१९७१ ५७.३७
१९७७ ५४.७०
१९८० ५३.४२
१९८४ ५६.५१
१९८९ ५४.८४
१९९१ ५०.७२
१९९६ ४८.५८
१९९९ ५७.८८
२००४ ४३.१३
२००९ ४८.३५
२०१४ ५८.८३
२०१९ ५९.४०
२०२४ ६०.७५
हेही वाचा: