नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर प्रदेशच नव्हे तर देशाच्या राजकारणात ठसा उमटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीदी मायावती यांचा बहुजन समाज पक्ष लोकसभेच्या रिंगणापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. एरवी लोकसभेत ‘गेमचेंजर’ची भूमिका बजावणाऱ्या बसपाच्या हत्तीची चाल यावेळी मंदावल्याचे चित्र आहे. नाशिक लाेकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत हमखास उमेदवार देणाऱ्या बसपाकडून यावेळी कोणाच्याही नावाची चर्चा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मते, उमेदवारांचा शोध सुरू असला तरी, आम्ही आगामी विधानसभा आणि मनपा निवडणुकीवर लक्ष ठेवून आहोत. (Lok Sabha Elections BSP)
बहुजन समाजाच्या हक्काचा बुलंद आवाज म्हणून बसपाकडे बघितले जाते. मात्र, वंचितच्या उदयामुळे समीकरण बदलले असून, कधीकाळी बसपाच्या विचारसरणीवर चालणारा मतदार आता वंचितकडे वळताना दिसून येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बसपाकडून राबविले जाणारे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग आता वंचित राबवू लागल्याने, इच्छुक तथा बंडखोर वंचितचा पर्याय अधिक सक्षम मानत आहेत. परिणामी बसपाला उमेदवार मिळणे दुरापस्त होत असल्याचे चित्र आहे. नाशिक लाेकसभा मतदारसंघात बसपाने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करताना २००९ मध्ये महंत सुधीरदास पुजारी यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. त्यानंतर २०१४ मध्ये दिनकर पाटील यांनी बसपाच्या तिकिटावर लाेकसभा लढविली. तर २०१९ मध्ये अॅड. वैभव अहिरे हे मैदानात होते. २००९ आणि २०१४ मध्ये बसपाच्या उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली होती. (Lok Sabha Elections BSP)
या निवडणुकीत बसपाकडून एकाही उमेदवाराचे नाव चर्चेत नसल्याने, बसपा लोकसभेच्या मैदानातून माघार तर घेणार नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर इच्छुकांकडून बंडखोरीची शक्यता आहे. मात्र, बंडखोरीच्या तयारीत असलेली मंडळीदेखील बसपाचा पर्याय विचाराधीन घेत नसल्याने, बसपाच्या हत्तीची चाल मंदावल्याची चर्चा रंगत आहे. (Lok Sabha Elections BSP)
बंडखोरीच्या तयारीत असलेल्या काही इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधला. मात्र, ते बसपाकडून उमेदवारी घेतील की नाही? याबाबत शंका आहे. पण, पक्षातीलच तीन पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक असून, त्यांच्यामधूनच एकास उमेदवारी देण्याबाबतचा विचार सुरू आहे. तिघांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडली असून, महायुती आणि वंचितचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आमचा उमेदवार घोषित केला जाईल. यावेळीदेखील आम्ही ताकदीने निवडणूक लढणार आहोत. – अरुण काळे, जिल्हाध्यक्ष, बसपा
हेही वाचा –