‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची माहिती दडवली, ६५० खासगी रुग्णालयांना नोटिसा

swine flue

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना खासगी रुग्णालयांकडून या आजाराच्या रुग्णांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ६५ वर्षीय स्वाइन फ्लूग्रस्त वृद्धा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तब्बल आठवडाभर ही माहिती दडवून ठेवण्यात आली होती. हा प्रकार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या लक्षात आल्यानंतर शहरातील सर्वच ६५० रुग्णालयांना सूचनापत्र पाठवत स्वाइन फ्लू तसेच डेंग्यूच्या रुग्णांची माहिती दररोज कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बदलते वातावरण आणि वाढते तापमान तापसदृश आजारासह डेंग्यूच्या साथीला निमंत्रण देणारे ठरले आहे. त्यातच आता स्वाइन फ्लूनेदेखील डोके वर काढले आहे. 10 दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील दातली गावातील वृद्ध महिलेचा बळी स्वाइन फ्लूच्या आजाराने घेतला. या वृद्धेवर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरातही दोघांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. स्वाइन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक आहे. मात्र दाभाडी येथील ६५ वर्षीय वृद्धेचा तपासणी अहवाल दि. १० एप्रिल रोजी स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह येऊनही संबंधित रुग्णालयाने वैद्यकीय विभागाला कळविले नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून महापालिकेला स्वाइन फ्लूची माहिती देण्यास टाळाटाळ गेली जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शहरातील सर्वच ६५० रुग्णालयांना सूचनापत्र पाठवत स्वाइन फ्लू व डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजारांविषयीची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला दैनंदिन कळविणे बंधनकारक केले आहे.

आणखी दोघांना स्वाइन फ्लूची लागण

शहरातील आणखी दोघांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांचा आकडा आता चारवर गेला आहे. यापैकी दोन रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराचे रुग्ण दाखल झाल्यास त्यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळवणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. मात्र काही खासगी रुग्णालये माहिती कळवत नसल्याचे अथवा उशिरा कळवत असल्याचे समोर आल्याने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना सूचनापत्र पाठवण्यात आले आहेत.

डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

——-०——–

हेही वाचा –