लोकसभेनंतर कर्नाटकात ‘ऑपरेशन नाथ’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही ‘ऑपरेशन नाथ’ राबविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ यशस्वी ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनोहर गार्डन येथे आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन नाथ’चा उल्लेख केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केवळ राज्यातूनच नव्हे तर, देशातील २५ राज्यांतून शिवसेने(शिंदे गटा)ला प्रतिसाद लाभत आहे. राजस्थानातील चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची साथ सोडणाऱ्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला म्हणूनच एकनाथ शिंदे आता सर्वत्र ओळखला जात आहे. कर्नाटकातही अशाच काहीशा हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बेळगाव येथे गेल्यानंतर उत्सुकतेने तेथील भाजप पदाधिकारी मला भेटायला आले. महाराष्ट्रात सत्तापालट करणारा कोण हा नाथ, हे त्यांना पाहायचे होते. त्यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही ‘ऑपरेशन नाथ’ होणार असून त्यात तुमचा अनुभव आमच्या कामी येणार असल्याचे त्यांनी मला सांगितले, अशी आठवण शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान याच विषयावर माध्यमांशी स्वतंत्रपणे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ‘ते जाऊ द्या’ असे सांगत उत्तर देण्याचे टाळले. नाशिक मध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर करताना उशीर झाला. त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात महायुतीची ताकद मोठी आहे. त्यामुळे उशिराने उमेदवार जाहीर झाला तरी फरक पडत नाही. लोकांची देखील महायुतीला साथ असल्याचे सांगितले. यावेळी पालकमत्री दादा भुसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, सुहास कांदे, अजय बोरस्ते, विजय करंजकर आदी उपस्थित होते.

भुजबळ, कोकाटेंची बैठकीला दांडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकमध्ये असूनही राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दांडी मारली. सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे हे देखील अनुपस्थित होते. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी महायुतीच्या नेत्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. जागा वाटपावरून कुठलीही नाराजी नाही, असे स्पष्ट केले.

हेही वाचा –