नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी झडपा झाल्या. महायुतीकडून पैसे वाटपाच्या तक्रारी असतानाच नाशिकच्या रायगड चौक परिसरातही मतदान केंद्रावर बोगस वोटिंग झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. बोगस मतदानाच्या तक्रारींवरून कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी वाद झाल्याचे चित्र होते.
येथे मतदानाच्या दिवशीही अनेक राजकीय घडामोडी घडल्याने राज्यभरात नाशिक प्रकाशझोतात आले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. मतदान झाल्यानंतर मतदान कक्षाला गळ्यातील हार घातल्याने शांतिगिरी महाराज वादात सापडले. केंद्रप्रमुखाला न जुमानता हार घातल्यामुळे त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात आचारसंहिताभंगचा गुन्हा दाखल झाला, तर अंबड पोलिस ठाणे हद्दीत त्यांच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. शांतिगिरी महाराजांचे चिन्ह आणि नाव असलेल्या स्लिप वाटणे, अंगावर परिधान केलेल्या कुर्त्यांवर जय बाबाजी नाव असल्याचा आक्षेप घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
जुने नाशिक भागात भाजप आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते आमनेसामने आले होते. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडेंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर गर्दी जमवून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला, तर पराभव दिसत असल्याने खोटे आरोप केले जात असल्याचा पलटवार ठाकरे गटाने केला. यावेळी भाजप आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
माजी नगरसेवक प्रशांत दिवे ताब्यात
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवे यांनी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे वाद झाला होता. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी दिवे यांना ताब्यात घेतले.
वाजे, गोडसेंविरोधात घोषणाबाजी
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नावाच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजभाऊ वाजे हे मतदारसंघात आढावा घेत असताना ही घटना घडली. जुन्या नाशकातील हुंडीवाला लेन भागातील मतदान केंद्रासमोर गोडसेंविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘गद्दार, गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली.
हेही वाचा: