विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी सूर्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटवला अन् हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली. भुसावळमध्ये राज्यात सर्वाधिक 45.9 अंश तापमान होते. अकोला 45.6, जळगाव 45, तर परभणी 44.7 अंशांवर गेले होते. दिवसभर भयंकर उकाड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले. दरम्यान, ही लाट 15 मेपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला.

शनिवारी सायंकाळी 7 वाजता हवामान विभागाने राज्यातील दिवसभराचे ताजे तापमान दिले अन् अंगावर शहारे आले. राज्यातील बहुतेक शहरांचे तापमान 43 ते 44 अंशांवर गेले, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दिवसा रस्त्यावरून फिरणे मुश्कील झाले आहे. अकोला शहराचा पारा 45.6 वर गेल्याने राज्यात हंगामातील सर्वोच्च तापमान शनिवारी नोंदवले गेले.

शनिवारचे तापमान
अकोला 45.6, जळगाव 45, परभणी 44.7, अमरावती 44.6, वर्धा 44.1, यवतमाळ 43, बीड 43, छत्रपती संंभाजीनगर 41.8,
मुंबई 34.6, रत्नागिरी 34, पुणे 38, कोल्हापूर 35.1, नागपूर 42.7, चंद्रपूर 42.4, गोंदिया, 41.6,
गडचिरोली 41.6, ब्रह्मपुरी 41.4, बुलडाणा 41.2 याप्रमाणे तापमानाची नोंद झाली.

‘मोखा’ बांगला देशकडे सरकणार

बंगालच्या उपसागरातील ‘मोखा’ या महाचक्रीवादळाचा वेग प्रचंड वाढला असून, ताशी 180 ते 220 किलोमीटरवर शनिवारी तो गेला. उद्या, 14 मे रोजी दुपारी ते बांगला देश व म्यानमारच्या दिशेने ते कूच करणार आहे. त्यामुळे मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर किनारपट्टी भागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

उष्णतेची लाट 15 मेपर्यंत

चक्रीवादळाने हवेतील बाष्प खेचल्याने देशभरात उष्णतेची लाट प्रखर आहे. त्यातही महाराष्ट्रात तीव्र लाट कायम आहे. हे वादळ 15 मे रोजी शमताच उष्णतेची लाट ओसरू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

The post विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात appeared first on पुढारी.