नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सीबिल स्कोअर, जामीनदारांशिवाय कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून हाक मराठी अर्बन निधी बँकेच्या संचालक मंडळासह व्यवस्थापनाने शहरातील २०४ नागरिकांना ३४ लाख १६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका संशयितास अटक केली आहे.
संशयितांनी २०२२ ते २२ मे २०२४ या कालावधीत कामटवाडे येथील माउली लॉन्सजवळील हाक मराठी अर्बन निधी बँकेच्या कार्यालयात फसवणूक केली. संशयितांनी कालांतराने कार्यालयही बंद करून पळ काढला. सोपान राजाराम शिंदे (३७, रा. नानेगाव) यांच्या फिर्यादीनुसार, बँकेचे संशयित संचालक भूषण सुरेश वाघ, वर्षा हिराचंद्र पाटील, मेघा योगेश बागूल, मनीषा सुरेश पाटील, अमित अनंत बने, सुरेश विनायक पाटील, चंद्रशेखर लक्ष्मण कडू आणि व्यवस्थापक एकनाथ निवृत्ती पाटील, योगेश गुलाब पाटील आणि बँकेतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करीत गंडा घातला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत असून, त्यांनी संशयित योगेश पाटील यास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अशी केली फसवणूक
संशयित भूषण वाघ याने उत्तमनगर बसस्टॉपजवळ बँक सुरू करून इतर संशयितांसोबत संगनमत करीत गंडा घालण्यास सुरुवात केली. बँकेचा नफा वाढविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्याचे भासवले. तसेच ग्राहकांना ‘ही बँक विनातारण, विना सिबिल स्कोअर, विना जामीनदार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करते’, अशी जाहिरात करीत आकर्षित केले. तसेच कर्जाचा व्याजदर कमी असून, ४५ दिवसांत प्रोसेस पूर्ण करून लोन देते’, अशी जाहिरात पाठवत होते. या जाहिरातीस भुलून नागरिकांनी प्रोसेसिंग फी व इतर खर्च म्हणून सुमारे ३५ लाख रुपये संशयितांना दिले. मात्र त्यांना कर्ज मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रारदार वाढण्याची शक्यता
या प्रकरणात शिंदे यांच्यासह इतर २०३ नागरिकांची कर्ज मंजुरी प्रकरणात फसवणूक झाली आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने संशयितांनी नागरिकांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणातील तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयितांचा शोध सुरू असून, संशयितांकडे आरबीआयचा बँक परवाना व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
हेही वाचा –