शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात

गाय पशुधन pudhari.news

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती भयानक होत आहे. पशुपालकांकडील जनावरांचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू न केल्यास पशुपालक आंदोलनाचा पवित्रा घेतील, असा इशारा शेतकऱ्यांसह पशुपालकांनी दिला आहे. शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी’ असे चित्र निर्माण झाले आहे.

उत्तर-पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा- पाण्याची भयंकर समस्या निर्माण झाली आहे. शासनाने टँकर हे माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली, तरी जनावरांसाठी पिण्याचे पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. उत्तर-पूर्व भागात यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्या, अशी मागणी उपसरपंच ज्ञानेश्वर दराडे, दत्ता सानप यांनी केली आहे.

राजापूर, सोमठाणजोश, ममदापूर, देवदरी, खरवडी, रहाडी, पन्हाळसाठे या भागांत पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चाऱ्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या भागांतील लोकांना रोजगार नाही, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा या सर्व गोष्टी काटकसरीने वापरून दिवस काढावे लागते आहेत, चारा एकदमच थोडासा शिल्लक राहिला आहे. या भागात कुठेही हिरवे गवत बघावयास मिळत नाही. शासनाने या भागाची पाहणी करूनही कुठल्याही उपायोजना आजपर्यंत झालेल्या नाहीत. तालुक्यातील पूर्व भागात चारा छावण्या, गोरगरीब जनतेला हाताला कामे, रोजगार उपलब्ध करून द्यावे, जनावरांना चारा, पाणी, उपलब्ध करावा अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला कामे नसल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह, संसाराचा गाडा कसा काय चालवायचा असा प्रश्न पडला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली संपूर्ण पिके पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. केलेला खर्चही वसूल झालेला नाही. त्यात आतापर्यंत जनावरांना इकडून तिकडून चारा आणून खाऊ घातला. पण आता या भागात भीषण पाणीटंचाई व चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनीही हार मानली आहे.

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात यंदा भीषण दुष्काळ आहे. पशुधन सांभाळ करण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहेत, जनावरांना चारा संपला आहे. जनावरांना जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. -दत्ता सानप, सुभाष वाघ, शेतकरी, राजापूर.

गेल्या वर्षापासून सुरू झालेले टैंकर आजही सुरू असले, तरी जनतेबरोबर मुक्या जनावरांना चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने या भागात चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्यात. -ज्ञानेश्वर दराडे, उपसरपंच, राजापूर.

The post शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात appeared first on पुढारी.