नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष किशोर दराडे यांचे अपहरण झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर रात्रीच्या सुमारास त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडे कुठलीही माहिती नसून, नातेवाइकदेखील त्यांच्या ठावठिकाणाबाबत अनभिज्ञ आहेत.
पोलिसांकडून माहिती घेतली असता, दराडे यांना नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यानंतर ते कुठे आहेत, याविषयी आम्हाला काहीही माहिती नाही. पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात देताना त्यांच्याकडून लेखी माहिती घेतल्याचे समजते आहे. – भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना शिंदे गट.
नाशिक रोड येथील विभागीय कार्यालयात शुक्रवारी (दि. ७) दुपारी 2.30 च्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे अर्ज दाखल करण्यास आले असता, त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला. हा संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर घडल्याने अपक्ष किशोर दराडे यांना संरक्षण देण्यासाठी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ते नाशिक रोड पोलिस ठाण्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी आई, वडील, भाऊ, पत्नी यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास पोलिसांनी त्यांना वडिलांसोबत सीबीएस बसस्थानकात सोडले होते. तेव्हापासून ते गायब असल्याने, त्यांचे अपहण केल्याची चर्चा सध्या रंगत आहे. याविषयी पोलिसांनी कानावर हात ठेवले असून, आमच्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांच्या नातेवाइकांकडे विचारपूस केली असता, त्यांनीदेखील दराडे यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितले आहे. गावातील रहिवासी तसेच मित्र परिवाराकडेही ‘ते नेमके कुठे आहेत’ याविषयी माहिती नसल्याने, अपहरणाची चर्चा चांगलीच रंगत आहे.
दराडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला?
गावातील काही रहिवाशांच्या मते, अपक्ष किशोर दराडे यांना शिवसेना शिंंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नेले आहे. त्यांचा मोबाइल बंद असल्याने, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेले असावे, असा दावाही अपक्ष दराडे यांच्या जवळच्या लोकांकडून केला जात आहे.
अपक्ष किशोर दराडे यांनी संरक्षणाची मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. रात्री ९.३० च्या सुमारास दराडे व त्यांच्या वडिलांना आम्ही सीबीएस बसस्थानक येथे सोडले होते. चारचाकीने गेल्यास माझा पाठलाग केला जाऊ शकतो, या भीतीने ते बसने गेले. मात्र, ते कुठे गेले, याविषयी त्यांनी आम्हाला काहीही सांगितलेले नाही. याविषयी आम्हाला माहिती नाही. – रामदास शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक रोड, पोलिस ठाणे.
हेही वाचा: