शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी

शोभा बच्छाव pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धुळे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या धुळे व नाशिक जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामास्त्र उगारले आहेत. त्यामुळे लोकसभा प्रचाराआधीच डॉ. बच्छाव यांना स्वकीयांची समजूत काढण्याची वेळ आली आहे.

डॉ. बच्छाव यांना काँग्रेस पक्षाने बुधवारी (दि.१०) उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे या मतदार संघातून इच्छुक असलेले नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामास्त्र उगारले आहेत. त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज झाल्याचे चित्र आहे. यात भाजपा उमेदवारास फायदा मिळवून देण्यासाठीच आयात उमेदवार दिल्याची नाराजी डॉ. शेवाळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, धुळे लोकसभा मतदार संघात प्रचारात पिछाडीवर असलेल्या महाविकास आघाडीचा उमेदवार जाहिर झाल्यानंतरही प्रचाराचा नारळ फोडता आला नसल्याचे चित्र आहे. स्वकियांची नाराजी दुर करून त्यांना सोबत घेऊन प्रचार करण्यासाठी बच्छाव यांच्यासह काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. तसेच त्यांची नाराजी दुर न झाल्यास त्याचा फटका बच्छाव यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समजूत काढू
पक्षातून अनेक पदाधिकारी इच्छुक होते. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार मला उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे नाराजी पसरली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी व पदाधिकाऱ्यांची नाराजी दुर करणार आहोत. सर्वांच्या सोबत काम करणार असून विजय मिळवू. प्रचारासाठी मतदार संघातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर राहणार असून चौक सभा, रॅली देखील घेण्यात येईल. तसेच इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रचारात आघाडी घेऊ. आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर प्रचाराची पुढील दिशा ठरेल. – डॉ. शोभा बच्छाव, उमेदवार, धुळे लोकसभा मतदार संघ.

डॉ. शोभा बच्छाव यांच्या समोर घोषणाबाजी
उमेदवारी जाहीर झाल्याने डॉ. शोभा बच्छाव या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना भेटण्यासाठी मालेगावी तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात गेल्या असता त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ. बच्छाव या कार्यालयाकडे येताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी डॉ. शेवाळे समर्थकांनी डॉ. बच्छाव यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे डॉ. बच्छाव या डॉ. शेवाळे यांना न भेटताच माघारी परतल्या.

हेही वाचा:

The post शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी appeared first on पुढारी.