सातपूर : पुढारी वृत्तसेवा- श्रमिकनगरमधील गंगासागरनगर परिसरात घरासमोर लावलेल्या तीन चारचाकी वाहनांच्या काचा कोयत्याने फोडण्याची घटना शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, या तथाकथित भाईंवर पोलिस कधी कारवाई करतील याकडे लक्ष लागून आहे.
श्रमिकनगर परिसरात चार ते पाच मद्यपी टवाळखोरांनी दहशत माजवण्याच्या हेतूने गंगासागरनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. यामध्ये श्रमिकनगर परिसरातील गणेश पाटील यांची (एम.एच १५, जी.व्ही.) टेम्पो ट्रॅव्हलर, शिवाजी थोरात यांची (एम.एच. १८, डब्लू ९४९५) इनोव्हा कार, राजेश हांडोरे यांची (एमएच १५, ई.एक्स. ५४०५) व्हॅगनार या तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. मध्यरात्री दीडच्या सुमारास जोरात आवाज आल्याने नागरिक घराबाहेर आले. तत्पूर्वी टवाळखोरांनी गाड्यांच्या काचा फोडून पळ काढला. वाहनांच्या काचा फोडण्यासाठी कोयत्याचा वापर केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
सदर घटनेबाबत माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांना समजले असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस प्रशासनास श्रमिकनगरमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
श्रमिकनगर परिसरात टवाळखोरांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नुकसान केले आहे. या घटनांचे प्रकार वारंवार घडत असून, पोलिसांचा धाक आता राहिलेला नाही. घटनेकडे पोलिस आयुक्तांनी लक्ष देऊन गुन्हेगांरावर कडक कारवाई करावी. – दिनकर पाटील, माजी सभागृहनेते, मनपा
———-
श्रमिकनगर परिसरात टवाळखोरांचा धुमाकूळ चालू आहे. गाड्या फोडणे, महिलांची छेडछाड, नागरिकांना घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. परिसरात गस्तीबरोबरच टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी.
– गणेश पाटील, स्थानिक नागरिक
हेही वाचा –