‘श्री काळाराम मंदिर’ नाव कसे पडले? काय आहे इतिहास?

काळाराम मंदिर नाशिक,www.pudhari.news

नाशिक : गणेश सोनवणे

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. श्री रामाची नाशिकमध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यातीलच काळाराम मंदिर हे नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. संपूर्ण देशभरासह विदेशातूनही पंचवटीत लोक दर्शनासाठी येतात.

श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीता चौदा वर्षाच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील ह्याच परिसरात पंचवटीत पर्णकुटी बांधून वास्तव्यास होते. चौदा वर्षाच्या वनवासकाळातील दहा वर्षानंतर सुमारे अडीच वर्षे श्रीप्रभुरामचंद्रांचे वास्तव्य ह्याच परिसरात होते असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे.

श्री काळाराम का म्हणतात?

मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. या तीन मूर्ती स्वयंभू असून वालुकामय व श्यामवर्ण असल्यामळे देवतेस श्री काळाराम म्हणतात. मूर्तीचे अस्तित्व प्राचीन आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजाचे अदिदैवत व श्री समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर अगाध श्रध्दा होती. श्री समर्थ रामदास स्वामींनी टाकळीस वास्तव्य करून व बारा वर्ष दररोज पंचवटीत येवून याच मूर्तीची उपासना केली. हा काळ इ.स. १६२० ते इ.स.१६३२ असा होता असे अभ्यासक सांगतात.

वनवासात असतांना श्री प्रभुरामचंद्रांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले असल्यामुळे त्यास विषेश महत्व व माहात्म्य प्राप्त झालेले आहे.

मंदिर कधी बांधले?

हल्लीच्या नयनरम्य व भव्यदिव्य अशा मंदिराच्या जागी पूर्वी लहानसे लाकडी मंदिर होते. याच मूर्ती प्रतिष्ठापित होत्या. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर कै. सरदार रंगराव ओढेकर यांनी कै. सवाई माधवराव पेशवे यांच्या सल्लामसलतीने बांधले. मंदिराचे बांधकाम इ.स.१७८० साली सुरू झाले व इ.स. १७९२ चे सुमारास पूर्ण झाले.

रोज त्रिकाल पूजा व सकाळी काकड आरती

इ.स. १५०० पासून श्री काळाराम प्रभूची पूजा अर्चा, पुजारी घराण्याकडे अव्याहतपणे चालत आलेली आहे. मंदिरात दररोज त्रिकाल पूजा होते. सकाळी ५.३० वाजता काकड आरती, दुपारी ११ वाजता, माधान्ह पुजा व रात्री ७.३० वाजता शेजारती होते. दर एकादशीस अभिषेकयुक्त स्नान व षोडषोपचार माध्यान्हपूजा व सकाळी ६.३० वाजता श्रीप्रभुरामचंद्रांच्या पादुकांची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढून मंदिरास प्रदक्षिणा होते. मंदिर दररोज सकाळी ५ वाजता उघडते व रात्री १० वाजता बंद होते.

मंदिरापर्यंत कसे जाल ?

काळाराम मंदिर हे नाशिकच्या पंचवटी परिसरात आहे.  जुने सीबीएस किंवा ठक्कर बाजार येथून येथे जाण्यास रिक्षा मिळतात. पंचवटीत रामकुंड परिसरात तुम्ही आलात तर अगदी पायी अंतरावर काळाराम मंदिर आहे.

हेही वाचा :

The post 'श्री काळाराम मंदिर' नाव कसे पडले? काय आहे इतिहास? appeared first on पुढारी.