संतापजनक! डंपर मागे घेताना चिरडून एकाचा मृत्यू

नाशिक : डंपर मागे घेताना त्याचा धक्का लागून जमिनीवर पडलेल्या व्यक्तीवरुन चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेसर शिवारात गुरुवारी (दि.६) घडली. बापू गायकवाड असे मयताचे नाव आहे. याबाबत अक्षय पटेल (२५, रा. लोणार गल्ली) याने येवला पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सायंकाळक्ष ५ वाजेच्या सुमारास डंपर (एमएच २७ बीएक्स ७६७३) मधील मरुम खाली करताना चालक सचिन संताेष पवार (रा. पारेगाव) याने वाहन मागे घेतले. तिथे उभ्या असलेल्या गायकवाड यांना धक्का लागल्याने ते खाली पडले. याचवेळी वेगात डंपरचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक हेंबांडे हे तपास करीत आहेत.

वायरमनकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक : घरातील वायरिंगचे काम करताना अल्पवयीन मुलीसमवेत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वारंवार अत्याचार करीत तिला गरोदर केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वायरमनविरोधात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अंबड लिंकरोडवरील पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयित अविनाश नानाजी गोसावी (रा. पिंगळेनगर, हिरावाडी) याने डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत पंचवटीतील लॉजवर अत्याचार केले. संशयित अविनाशने पीडितेच्या घरात काम करताना प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अज्ञात कारच्या धडकेत एक ठार

नाशिक : कारमध्ये बसणाऱ्या व्यक्तीस अज्ञात कारने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना आडगाव येथील साईकृपा होलसेल टेक्स्टाइल मार्केटसमोर घडली. या अपघातात नासिर रहिमुल्ला खान (४२, रा. मुंबई) यांचा मृत्यू झाला. आबताफ शेख (३८, रा. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, ते रविवारी (दि. ९) मध्यरात्री मित्रांसमवेत चाळीसगाव येथे जात होते. त्यावेळी नासिर खान हे त्यांच्या कारमध्ये बसत असताना, त्यांना ओझरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारची धडक बसली. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

परप्रांतीयास मारहाण, चॉपरने वार

नाशिक : फुलेनगर येथील शनिमंदिराजवळ तिघांनी मिळून छोटू रामसुरत चव्हाण (२६, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. फुलेनगर) यास मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी घडली. छोटू यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गणेश माने व इतर दोघांनी मिळून विनाकारण मारहाण करीत चॉपरने वार करून दुखापत केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक महिलेचा विनयभंग

नाशिक : दाेघांनी मिळून खाद्यविक्रेत्या महिलेस शिवीगाळ, दमदाटी करीत विनयभंग केल्याची घटना रविवार कारंजा परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित रोशन गांगुर्डे व त्याच्या मित्राविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. रविवारी (दि. ९) सायंकाळी ७.३० च्या सुमारास संशयिताने हुज्जत घालून विनयभंग केला.

पोटमाळ्यावरील सोन्याचे दागिने लंपास

नाशिक : घरात शिरून पोटमाळ्यावर लपवलेले सोन्याचे दागिने चाेरट्याने चोरून नेल्याचा प्रकार शिंदेगाव परिसरात घडला. आशा उत्तम झाडे (रा. शिंदेगाव) यांच्या फिर्यादीनुसार, दि. १ ते ८ जून दरम्यान, चोरट्याने घरात शिरून ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. आशा यांनी पोटमाळ्यावर रिकाम्या डब्यात सोन्याचे दागिने ठेवले होते. ते चोरट्याने चोरले. नाशिक रोड पोलिस चोरट्यांना शोध घेत आहेत.

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका

चांदवड : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करत पोलिस व नागरिकांनी नऊ जनावरांची सुटका केली. वाहनचालक गाडी सोडून फरार झाला. याप्रकरणी चांदवड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, गाडीसह जनावरे ताब्यात घेतली आहेत. वाद गावच्या शिवारातील देवरे वस्तीने रविवारी (दि. ९) सकाळी ६.३० च्या सुमारास पिकअप (एमएच ४१, जी ३३१६) मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. यानुसार पोलिस व गावकऱ्यांनी वाद येथे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. या वाहनाचा पाठलाग सुरू केला असता चालकाने वाहन सोडून पळ काढला. वाहनात निर्दयतेने नऊ जनावरे बांधल्याचे दिसून आले. या कारवाईत ४७ हजार रुपये किमतीच्या आठ गायी व एक बैल यांची सुटका करण्यात आली.

चांदवड : मालेगाव दिशेने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनात निर्दयतेने बांधलेली जनावरे. (छाया : सुनील थोरे).

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

नाशिक : भरधाव कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला ठोस दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना दिंडोरी – वणी रस्त्यावर शनिवारी (दि.८) घडली. कृष्णगाव शिवारात खंडेराव मंदिरासमोर हा अपघात झाला. याबाबत काशिनाथ पवार (३४, रा. चौसाळे) यांनी फिर्याद दिली आहे. कार (एमएच १४ एलई ३८६५)वरील अज्ञात चालकाने दिंडारी दिशेने जाताना दुचाकीला (एमएच १५ जीआय ८७४९) धडक दिली. त्यावरील चालक जखमी होऊन वाहनांचे नुकसान झाले. वणी पोलिस तपास करत आहेत.