नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मतदानासाठी मतदारराजाला साकडे घातल्यानंतर आता मंगळवारी (दि.४) होऊ घातलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी विजयासाठी देवाचा धावा सुरू केला आहे. उमेदवारांकडून निकालापूर्वी देवदर्शनाला प्राधान्य दिले जाणार असून त्यानंतरच निकालाकडे वळणार असल्याचे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी सांगितले.
यंदा लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात गेल्या २० मे रोजी मतदान झाले. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे तसेच अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत झाली. तर दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत झाली. राजकीय पक्षांचे नेते तसेच उमेदवारांकडून मतांचा जोगवा मागताना मतदारांना अनेक आश्वासने दिली गेली. आता मतदान होऊन तब्बल १५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारी (दि.४) या निवडणुकीचा निकाल बाहेर येणार आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी अंबड वेअर हाऊस येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होत आहे.
या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने कार्यालयासमोर विजयोत्सवाची तयारी केली आहे. भाजप कार्यालयात निकाल बघण्यासाठी स्क्रीन लावला जाणार आहे. निकालानंतर कार्यालयासमोर पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला जाणार आहे. तर शिंदे गटाने देखील जल्लोषाची तयारी केली आहे. महाविकास आघाडीनेही विजयाचा दावा केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी झाली आहे. उमेदवारांची धडधड मात्र वाढली असून विजयासाठी सर्वच उमेदवारांनी देव पाण्यात बुडविले आहेत.
नाशिकमधून आपलाच विजय निश्चित आहे. किमान ७५ हजार मताधिक्य मिळणे अपेक्षित आहे. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे, घेतलेले निर्णय, मतदारसंघात केलेली कामे, निवडणुकीत मिळालेली महायुतीतील सर्वच घटक पक्षांची साथ यामुळे आपल्या विजयाची हॅटट्रीक नक्कीच साधली जाईल. सकाळी काळाराम दर्शन व त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर निकाल बघितला जाईल. – हेमंत गोडसे, उमेदवार, महायुती, नाशिक मतदारसंघ
नाशिकमध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. नाशिककरांनी आपल्या बाजुने कौल दिला आहे. तब्बल दोन लाखांच्या मतांच्या फरकाने आपला विजय होईल. मतदारराजा हेच आपले दैवत आहे. आपल्या या दैवताला स्मरून निकाल बघितला जाईल. जे मतदारराज्याच्या मनात तेच मतदान यंत्रातून बाहेर येईल. – राजाभाऊ वाजे, उमेदवार, महाविकास आघाडी, नाशिक मतदारसंघ
दिंडोरी मतदारसंघातील मतदारांना अपेक्षित असलेला निकाल येणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मी प्रतिनिधी असल्यामुळे विजयाची खात्री आहे. निकालापूर्वी वणीच्या सप्तश्रृंगीचे दर्शन घेईल. त्यानंतर कादवा साखर कारखानास्थळी पक्षनेते श्रीराम शेटे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत निकाल बघितला जाईल. – भास्कर भगरे, उमेदवार, महाविकास आघाडी, दिंडोरी मतदारसंघ
गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आपण पुन्हा एकदा मोठ्या फरकाने निवडून येऊ याचा विश्वास आहे. जनतेचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथील सभेत माझ्या कार्याविषयी केलेला उल्लेख अभिमानास्पद आहे. – डॉ. भारती पवार, उमेदवार, महायुती, दिंडोरी मतदारसंघ.
हेही वाचा :