नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हाणामारीसह विविध कलमांतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आणि पोलिसांना हवा असलेल्या फरार संशयित आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आदित्य नितीन केदारे (२२, रा. सातपूर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाची मारहाण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, आर्थिक नुकसान करणे आदी कलमांअतर्गत गेल्या २४ मार्च रोजी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता. त्याचा शोध घेत असताना पोलिस हवालदार राजेंद्र घुमरे, महेश खांडबहाले यांना तो महात्मानगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपासासाठी त्यास सातपूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
हेही वाचा –