सिटी लिंकच्या ३५ बसेस पुन्हा रस्त्यावर उतरणार

सिटीलिंक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – येत्या १५ जूनपासून शाळेची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सिटीलिकची शहर बससेवाही सज्ज झाली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्यांमुळे बंद केलेल्या ३५ बसेसची सेवा येत्या १८ जूनपासून पूर्ववत सुरू केली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सेवेकरिता ११५ बसफेऱ्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती सिटीलिंकचे महाव्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून गेल्या ८ जुलै २०२१पासून शहर बससेवा चालविली जात आहे. यासाठी महापालिकेने स्वतंत्ररीत्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना करत ‘सिटीलिंक कनेक्टिंग नाशिक या घोषवाक्याखाली ही बससेवा सुरू केली आहे. ‘ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट’ तत्त्वावर खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ६३ मार्गावर २४५ बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. चांगल्या दर्जाच्या प्रवासी सुविधांमुळे सिटीलिंकची ही बससेवा अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरली आहे. विशेषतः कामगारवर्ग आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही बससेवा उपयुक्त ठरत आहे. शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्यामुळे सिटीलिकच्या
प्रवासी संख्येत घट झाली होती. त्यामुळे २४५ पैकी ३५ बसेसची सेवा २५ एप्रिलपासून बंद करण्यात आली होती. या बसेस डेपोत उभ्या करण्यात आल्या होत्या. याशिवाय अन्यही काही बसेसच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली होती. आता येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. दि. १६ रोजी रविवार व दि. १७ रोजी बकरी ईद असल्याने दि. १८ जूनपासून सिटीलिकच्या बंद केलेल्या ३५ बसेसची सेवा पूर्ववत सुरू केली जाणार आहे.

बस पास केंद्रांमध्येही वाढ

सिटीलिकच्या प्रवासी पास सेवेकरिता सद्यस्थितीत निमाणी बसस्थानक व सिटीलिंकच्या त्र्यंबक रोडवरील कार्यालयात प्रत्येकी एक केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी निमाणी बसस्थानक, सिटीलिंक कार्यालय, केटीएचएम महाविद्यालय येथे प्रत्येकी दोन तसेच शिवाजीनगर येथे एक पास केंद्र सुरू केले जाणार आहे.

सिटीलिकची सेवा समर्पित आहे. उन्हाळी सुटीनंतर शाळा महाविद्यालये सुरू होत असल्याने सिटीलिकची बसेस संख्या तसेच्या फेऱ्यांच्या संख्येतही पूर्ववत वाढ करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अतिरिक्त पास केंद्रेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. –
मिलिंद बंड, महाव्यवस्थापक (संचलन) सिटीलिंक.

हेही वाचा: