सिन्नरच्या वाजे घराण्याला प्रगल्भ राजकीय वारसा लाभलेला आहे. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा स्वतंत्र महाराष्ट्रात सिन्नरचे पहिले आमदार ठरले स्व, शंकरशेठ बाळाजी वाजे, त्यांची चुलत आजी पहिल्या महिला आमदार राहिल्या स्व. रुख्मिणीबाई विठ्ठलराव वाजे. आणि राजाभाऊ यांच्या आजी स्व. मथुराबाई शंकरराव वाजे यांनी पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून इतिहासाच्या पानांत नाव कोरलेले आहे. हाच प्रगल्भ वारसा घेऊन राजकारणाच्या वाटेवर निघालेल्या राजाभाऊ वाजे यांनी ‘सिन्नरचे प्रथम खासदार ही विरुदावली निर्माण केली आहे. लोकसभेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजाभाऊ बाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्याच बाबी सकारात्मक घडत गेल्या. ‘आपला माणूस’ खासदार होणार ही भावना सिन्नर तालुक्यातील प्रत्येक माणसात रुजली. कट्टर विरोधक असलेल्या आमदार माणिकराव कोकाटे यांनीही संयमाची भूमिका घेतली. परिणामी, राजाभाऊ वाजे यांना होमग्राउंडवर भरभक्कम मताधिक्क्याची उभारणी करता आली. या दोन्ही बाबीची गोळाबेरीज वाजे यांच्या निर्भेळ यशात परिवर्तित झाली.
एखाद्या क्रिकेटरने होमग्राउंडवर धावांचा पाऊस पाडावा अन् संघाला एकहाती विजयासमीप पोहोचवावे अशीच काहीशी परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीत बघायला मिळाली राजाभाऊच्या होमग्राउंडवर नेमके काय घडले, हे पहिल्या फेरीपासूनच्या मतमोजणीत समजत गेले. फेरीनिहाय हे मताधिक्य वाढत गेले. अंतिमतः सिन्नर विधानसभा मतदारसंघातून मिळालेले सुमारे सव्वा लाखाचे लीड तोडताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची दमछाक झाली. राजाभाऊ वाजे यांना खासदार करायचेच, अशी खूणगाठ मनाशी बांधून सिन्नर तालुकावासीयांनी या निवडणुकीत मेहनत घेतली. पदरमोड करून, घरच्या भाकरी बांधून प्रचार केला. यालाच ‘तन-मन-धन से म्हणतात. त्याचे फलित निकालात बघायला मिळाले.
आमदार कोकाटे व वाजे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक, पण आरंभीपासूनच कोकाटे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीला केलेला विरोध आणि वाजे यांच्या विरोधात म्यान केलेली तलवार हे सारे बरेच काही सांगणारे ठरले. गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला झालेल्या एकमेव सभेतील जाहीर भाषणातही माणिकरावांनी आपल्या विकासाच्या योजना मांडल्या, राजाभाऊंच्या विरोधात ‘ब्र’ शब्दही कावला नाही. विरोधी उमेदवार अर्थातच राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात बोलणार नाही, ही भूमिकाही त्यांनी तत्पूर्वीच जाहीर केली होती. त्यांचे काही समर्थक तर आधीच वाजे यांच्या गोटात सामील झाले होते. या सगळ्यातून मतदारांमध्ये काय तो सकारात्मक संदेश पोहोचला होता. त्यामुळे सिन्नरमधून राजाभाऊ वाजे यांना मोठे मताधिक्य मिळू शकले, कोकाटे पुऱ्या ताकदीनिशी मैदानात उतरले असते तर कदाचित एवते मताधिक्य अशक्य होते. अर्थात राजाभाऊ खासदार झाल्यामुळे विधानसभेची वाट सुकर होईल, अशी कोकाटे यांच्या हेतूची चर्चा आहे.
आप्पांच्या हातून तेलही गेले अन् तूपही…
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट आणि नशिबाची साथ मिळालेल्या हेमंत गोडसे यांनी यंदाच्या पंचवार्षिकमध्ये टाकलेले सगळे फासे उलटेच पडले. नाशिकची जागा शिंदे गटाला सुटेल आणि आपल्याला सहज उमेदवारी मिळेल, असा त्यांचा कयास होता. मात्र तो भ्रम ठरला. एकापेक्षा एक सरस इच्छुक मैदानात उतरल्याने शिंदे गटाची कोंडी झाली. त्यातून नाराजीनाट्य उभे राहिले. त्यातून महायुतीच्या एकोप्याला छेद बसलेला बघायला मिळाला. इकडे सिन्नरच्या बाचतीत बोलायचे झाले तर गोडसे यांनी खासदारकीच्या काळात आमदार कोकाटे यांच्या विरोधात वाजे गटाला बळ दिले. पुढे जाऊन वाजे हेच प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून उभे ठाकले, ज्यांना मदत केली, त्यांच्याशी दोन हात करण्याचा प्रसंग निर्माण झाला. आपल्या विरोधकांना बळ दिले म्हणून कोकाटे यांची नाराजी होतीच. ती काही शमली नाही, परिणामी सिन्नरमध्ये सरतेशेवटी ‘तेलही गेले अन् तूपही’ अशी गोडसे यांची अवस्था झालेली बघायला मिळाली.
हेही वाचा: