हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने मित्रावर शस्राने वार, चौघांवर गुन्हा

दारुपार्टी ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाच मित्र-मैत्रीण शहरातील एका हॉटेलमध्ये ओल्या पार्टीसाठी जमले. मद्यसेवन करून जेवन रिचवल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरून चाैघांनी हात वर केले. तर पाचव्यानेही बिल देण्यास नकार दिला. त्यामुळे चौघांनी मिळून पाचव्या मित्रास मारहाण करीत शस्त्राने वार करून दुखापत केल्याची घटना शरणपूर रोडवरील जुने पोलिस आयुक्तालयाजवळील एका हॉटेल मध्ये घडली. याप्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मखमलाबाद रोड परिसरातील रहिवाशी तवीन ठक्कर (२३) याच्या फिर्यादीनुसार संशयित ओम काजळे, ऐश्वर्या आडगावकर यांच्यासह इतर दोघांनी सोमवारी (दि.८) रात्री सव्वा नऊ वाजता मारहाण केली. तवीन याच्या फिर्यादीनुसार तो इतर चौघांसह शरणपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला. तेथे ‘ओली पार्टी’ रंगली. रात्री उशिरापर्यंत मद्यसेवन व जेवन करताना मैफल रंगली होती. त्यानंतर हॉटेलचे बील टेबलवर आले. बिल बघताच संशयितांनी बिलाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी तवीन यास बिलाचे पैसे देण्यास सांगितले. मात्र, त्यानेही बिल देण्यास नकार दिला. त्यावरुन पाचही जणांमध्ये वाद झाले. वाद वाढल्यानंतर इतर चौघांनी मिळून तवीन यास शिवीगाळ, मारहाण केली. त्यानंतर चाकूने तवीनवर वार करून दुखापत केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संशयितांना अद्याप अटक केली नसून, त्यांना नोटिस बजाविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणीविरोधात याआधीही गुन्हे

मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित तरुणी एेश्वर्या हिच्याविरोधात याआधीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयफोन चोरल्याप्रकरणी तिच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर २०१८ मध्ये आर्थिक व्यवहारातून सिडकोत एका व्यक्तिच्या घरातून मोबाइल, एटीएम कार्ड ओरबाडून नेल्याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मित्रांमध्ये वाद नित्याचे होत असतात, त्याप्रकरणी पोलिसांकडे काही तक्रारीही आहेत.

हेही वाचा-

The post हॉटेलचे बिल देण्यास नकार दिल्याने मित्रावर शस्राने वार, चौघांवर गुन्हा appeared first on पुढारी.