कैरी धुण्यासाठी पाण्याकडे गेला अन् अनर्थ झाला

पाण्यात बुडून मृत्यू www.pudhar.news

त्र्यंबकेश्वर- पुढारी वृत्तसेवा – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे चाकोरे चक्रतिर्थ येथील नदी प्रवाहात बुडाल्याने नाशिक येथील 15 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरूवार (दि. 25) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास  मोहंमद खान माजीद खान पठाण (वय 15) वर्ष राहणार काठे गल्ली, द्वारका नाशिक हा मुलगा त्याच्या पाच मित्रांसह बेझे चाकारे चक्रतिर्थ येथे फिरायला आला होता. च्रकतिर्थाच्या पुढे गोदावरी नदीचा प्रवाह आहे. सर्व मुले तेथे सोबत आणलेले खाद्य पदार्थ खाण्यास बसले असता त्यांनी रस्त्यात तोडलेली कैरी धुण्यासाठी मोहंमद पाण्याकडे गेला. कैरी धुवत असतांना पाय घसरला व तोल जाऊन तो पाण्यात पडला.

हा प्रकार पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. जवळच वीज पंपाने शेतीला पाणी भरत असलेल्या शेतक-यांनी धाव घेतली. गटांगळया खात असतांनाच त्याला बाहेर काढले. ही सर्व मुले दोन स्कुटर घेऊन आलेले होते. त्यांनी मोहंमद याला स्कुटरवर टाकत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. तेथे उपस्थित ग्रामस्थांनी वाहनाने त्याला त्र्यंबक उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान या सर्व मुलांची गुरूवारी सकाळी फुटबॉल मॅच होती. ती रद्द झाल्याने सर्वांनी फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यात मयत मोहंमद पठाण हा यापूर्वी या चाकोरे परिसरात येवून गेलेला होता व तो सर्वांना या ठिकाणी घेऊन आला होता अशी माहिती त्याच्या मित्रांनी येथील ग्रामस्थांना दिली. त्र्यंबक पोलीस ठाण्याचे हवालदार रूपेश मुळाणे यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. बेझे चाकोरे सरपंच कैलास पोटींदे, सुरेश चव्हाण, बाळु शेवरे, रामा शेवरे, समाधान आलवने आदींनी मदत करत सर्वांना बेझे गावा पर्यंत घेऊन आले तेथून पोलीसांना संपर्क करत रूग्णवाहिका मागवली.

हेही वाचा –