२० लाखांसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास जीवे मारण्याची धमकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जागा खरेदी-विक्रीच्या वादातून दोघांनी मिळून एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास मुलास जीवे मारण्याची धमकी व्यावसायिकास दिली. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये कार्यालय असलेले बांधकाम व्यावसायिक समीर श्यामराव केदार (४८) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सूर्यभान गयाजी जाधव व ओम सूर्यभान जाधव (दोघे रा. गंगापूर गाव) यांनी खंडणीची मागणी करीत धमकी दिली. सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार व जाधव यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले होते. संशयित जाधव हा एक जमिन खरेदी करणार होता. मात्र, त्याचा व्यवहार पूर्ण न झाल्याने केदार यांनी संबंधित जमीन खरेदी केली. त्यानंतर जाधव याने केदार यांना आणखी एका जागेचा प्रस्ताव ठेवला. त्यासाठी केदार यांनी जाधव यांना धनादेश दिले. मात्र, जाधव यांच्याविराेधात गुन्हा असल्याचे समजल्याने केदार यांनी व्यवहारापोटी दिलेल्या धनादेशाचे पेमेंट थांबवले. त्यामुळे जाधव यांना पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, इतर गुन्ह्यात संशयित जाधव हा पाच वर्षांपासून कारागृहात होता. दोन वेळेस ते जामिनावर बाहेर आले. त्यानुसार २३ एप्रिलला त्यांनी केदार यांचे कार्यालय गाठून पैशांची मागणी करीत धमकावल्याची तक्रार आहे. याप्रकरणी पोलिस संशयितांचा शोध घेत आहे. 

हेही वाचा –