अबोल छायाचित्रांचा बाज, त्याला लाभतोय शब्दांचा साज

World Photography Day,www.pudhari.news

दीपिका वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डोळ्यात जगण्याची आस घेऊन आयुष्याची सुरकुतलेली कर्मकहाणी सांगत.. क्षणभर विसावली माउली.. डोईवर फाटक्या संसाराची लक्तरे टांगत.. (World Photography Day)

कष्टांची झाली परिसीमा तरीही चेहऱ्यावर हसू ओसंडे.. चल आयुष्याचा तोल सांभाळत घेऊन सुख-दु:खाचे हंडे..

फोटोग्राफीमध्ये वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, इव्हेंट, स्ट्रीट, आर्किटेक्चर, कॅन्डिड, नेचर असे फोटोग्राफीचे अगणित प्रकार आहेत. परंतु इमोशन्स कला आणि त्याला शब्दांची जोड देत फोटोग्राफीच्या माध्यमातून व्यक्त करण्याच्या प्रकाराला चित्र कविता किंवा चित्रचारोळी म्हटले जाते. दैनंदिन जीवनात छोट्या-छोट्या घडणाऱ्या प्रसंगांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्यामुळे बऱ्याचदा चित्र प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती सर्वसामान्य माणसाच्या लगेचच लक्षात येत नाही. फोटोग्राफरने टिपलेले चित्र त्यामागील भावना, विचार यांना शब्दांची जोड दिली तर फोटोग्राफरचा फोटो कैद करण्यामागचा दृष्टिकोन लगेच कळताे. वास्तविक चित्रांना शब्दाची गरज नसते पण चित्रातील भावनांना शब्दांची जोड दिल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना फोटोग्राफी लगेच कळते. (World Photography Day)

सध्या कोरड्या होत जाणाऱ्या भावना, संकुचित, आत्मकेंद्री समाजात जनजागृती करण्यासाठी कॅमेराबद्ध केलेल्या चित्रांना शब्दांमध्ये गुंफून फोटोग्राफी केला जाते. कलाकाराला व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी प्रभावी माध्यम असते. चित्रकवितेचा आस्वाद घेताना कलारसिकांना फोटोग्राफरला नक्की काय म्हणायचे आहे ते तर समजतेच पण त्याचबरोबर तो फोटो बघताना त्यांच्या मनात कोणत्या भावना येते त्याचे आकलन होऊन फोटोचा आनंद मनापासून घेता येतो आणि हाच चित्रचारोळी फोटोग्राफीचा मुख्य उद्देश असतो. (World Photography Day)

चित्रांना शब्दांची गुंफण 

गेल्या १५ वर्षांपासून आर्ट थेरपी क्षेत्रात काम करतेय. आर्ट थेरपी म्हणजे कलेच्या माध्यमातून भावनांचे व्यक्त होणे. याआधी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करत होते, पण आता वर्षातून एकदा टांझानियाला जाऊन वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करते. चित्रचारोळी या फोटोग्राफीने परिपक्व दृष्टिकोन मिळाला. कलाकाराला सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणे आवश्यक आहे आणि त्यातून जन्माला आली चित्रचारोळी संकल्पना. ज्यामध्ये फोटो व फोटोत मला काय भावना जाणवल्या त्या भावनांचे सोप्या भाषेतून शब्दांकन. भावना व्यक्त करण्यासाठी त्या नक्की कोणत्या आहेत त्याची जाणीव, आकलन होणे महत्त्वाचे आहे. चित्रचारोळी या उपक्रमातून सध्या नाशिक परिसरात फोटोग्राफी सुरू आहे. सभोवती घडणारे छोटे-मोठे प्रसंग पण जीवनाचे सार सांगून जातात तेच या उपक्रमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

– सोनाली जोशी, फोटोग्राफर

हेही वाचा :

The post अबोल छायाचित्रांचा बाज, त्याला लाभतोय शब्दांचा साज appeared first on पुढारी.