Nashik News | ‘पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर’; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान

पर्यावरण पुरस्कार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पर्यावरण संवर्धनाबाबत नाशिक जिल्हा अतिशय सतर्क आहे. येथे पर्यावरणावर प्रेम करणारे आणि ते जपणारे नागरिक आहेत. त्यांच्या असण्यानेच या ठिकाणी पर्यावरण बहरत चालले आहे. या ठिकाणी असलेल्या विविध संस्थांनी पर्यावरण संरक्षणाची चळवळ हाती घेत तिला बळकट केले आहे. त्यामुळेच जटायू संवर्धनातही नाशिक आघाडीवर असेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शहरातील कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या विविध पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी संस्थांनी जिल्ह्यातील निसर्गसेवकांचा सन्मान केला. या कार्यक्रमात वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, मुख्य वनसंरक्षक हृषिकेश रंजन, बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, पर्यावरणाबाबत नाशिककर जागरूक आहेत. मात्र पर्यावरणाबाबत काही ना काही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्याचे संवर्धन करण्यासाठी निसर्गप्रेमी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी वनविभागाकडून गिधाड संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हरसूल, पेठ व तळेगाव या तीन ठिकाणी गिधाडांसाठी उपाहारगृह चालविले जात आहेत तसेच शासनाकडून मिळालेल्या आठ कोटी रुपयांच्या निधीतून लवकरच अंजनेरी येथे गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगितले. मनोज साठे यांनी प्रास्ताविक, तुषार पिंगळे, दीपा ब्रह्मेचा यांनी सूत्रसंचालन केले. अंबरीश मोरे यांनी आभार मानले.

सन्मानार्थी असे…
१) वैद्य शंकर शिंदे, खोरीपाडा, हरसूल
२) देवीचंद महाले, त्र्यंबकेश्वर
३) जुही पेठे, नाशिक
४) इको-एको वन्यजीव संस्था, वैभव भोगले
५) प्रतीक्षा कोठुळे, पक्षिप्रेमी
६) डॉ. अनिल माळी, दत्ता उगावकर.
७) पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार.

The post Nashik News | 'पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर'; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान appeared first on पुढारी.