सुधीर मुनगंटीवार : सावाना कार्यक्षम आमदार-खासदार पुरस्कार प्रदान

सुधीर मुनगंटीवार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्यांच्या मनात राजकारणाविषयी दूषित मत आहे. राजकारण सामान्यांचे नाही तर लुच्चे-लफंग्यांचे काम असते; परंतु आता काळ बदलतो आहे. देशाच्या प्रगतीत जो स्पीडब्रेकर होता तो कमी होत आहे. राजकारणांच्या आयुष्यात पुरस्कार कमी तिरस्कार अधिक असल्याचे मनोगत सांस्कृतिक, वने व मस्त्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार व खासदार पुरस्कार समारंभात पुरस्काराला उत्तर देताना परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ते बोलत होते. सावाना कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना, तर कार्यक्षम आमदार पुरस्कार सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प. पू. अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाविषयी अनास्था म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे. कोणत्याही देशाची प्रगती धनसंपत्तीवरून नाही तर ज्ञानसंपन्नतेवरून होते. आनंदी व्यक्ती देशाची संपत्ती असते. वाचनातून अंतर्मनाला दिशा मिळत असते म्हणूनच वाचनालयांची गरज अधिक असते. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत डॉ. पवार यांना असाच कागद प्राप्त व्हावा, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

डॉ. पवार यांनी पुरस्काराला उत्तर देताना, पुरस्कार मिळाल्यानंतर टॉनिक घेतल्यासारखे काम करायला ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले. येत्या काळात मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याचा मानस व्यक्त करत त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी पुरस्काररूपी मिळालेले ५० हजार रुपये मुनगंटीवार व पवार यांनी त्यामध्ये वाढीव ५१ हजार रुपये करत असा एक लाखाचा निधी वाचनालयाला दिला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुनील ढिकले, ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, वैद्य विक्रांत जाधव, देवदत्त जोशी, संजय करंजकर, ॲड अभिजित बगदे व सावाना पदाधिकारी उपस्थित होते. गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन, तर जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले.

The post सुधीर मुनगंटीवार : सावाना कार्यक्षम आमदार-खासदार पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.